लिओनार्डो दा विंची यांनी १४९५ मध्ये काढलं होतं एक स्केच, ५०० वर्षांनंतर समोर आलं त्याचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:48 IST2025-02-19T12:30:00+5:302025-02-19T12:48:49+5:30

Sforza castle Tunnels : हे भुयार किल्ल्याच्या खाली आहेत आणि इतिहासकारांना यांच्या अस्तित्वाबाबत शंका होती. मात्र, आता खुलासा झाला आहे की, किल्ल्याखाली हे भुयार आहेत.

Sforza castle Tunnels : प्रसिद्ध चित्रकार, वैज्ञानिक, इंजिनिअर लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग्स जगभरात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांच्या नोटबुक्समध्ये अनेक स्केच आणि डिझाइन आहेत, जे अनेक इतिहासकार आणि वैज्ञानिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरतात. अलिकडेच वैज्ञानिकांनी त्यांच्या एका फारच अनोख्या ड्रॉइंगच्या रहस्याचा खुलासा केला आहे.

मिलान येथील स्फोर्जा किल्ल्याखालील गुप्त भुयारांची माहिती समोर आली आहे. ज्यांचा उल्लेख दा विंची यांनी १४९५ च्या आसपास आपल्या एका स्केचमध्ये केला होता. हे भुयार किल्ल्याच्या खाली आहेत आणि इतिहासकारांना यांच्या अस्तित्वाबाबत शंका होती. मात्र, आता खुलासा झाला आहे की, किल्ल्याखाली हे भुयार आहेत.

हा शोध लावण्यासाठी मिलानच्या पॉलिटेक्निक यूनिव्हर्सिटीतील अभ्यासकांनी किल्ल्याचे अधिकारी आणि इंजिनिअर कंपनी Codevintec Italiana सोबत मिळून काम केलं. त्यांनी किल्ल्याच्या संरचनेचं डिजिटल स्कॅन तयार केलं आणि अशा काही गोष्टींचा शोध लावला ज्या ५०० वर्षांपासून रहस्य होत्या.

अभ्यासकांनी लेजर स्कॅनिंग, जीपीएस टेक्निक आणि ग्राउंड-पेनेट्रेटिंग रडारचा वापर केला. ज्यातून समोर आलं की, दा विंची यांच्या स्केचमध्ये दाखवण्यात आलेले भुयार खरंच स्फोर्जा किल्ल्याखाली आहेत.

स्फोर्जा किल्ल्याचं निर्माण १३५८ मध्ये सुरू झालं होतं. पण वेळोवेळी हा किल्ला नष्ट करण्यात आला आणि पुन्हा बांधण्यात आला. आज किल्ल्याचा केवळ सहावा भाग शिल्लक आहे. १४०० मध्ये याला नष्ट केल्यानंतर मिलानचे ड्यूक फ्रांसेस्को स्फोर्जा यांनी हा पुन्हा बांधला. त्यावेळी लिओनार्डो दा विंची यांच्यासारख्या महान कलाकाराला किल्ल्याची सजावट आणि निर्माण कार्यात सहभागी करून घेण्यात आलं होतं.

दा विंची यांनी यांनी यादरम्यान काही चित्र आणि डिझाइन तयार केले, ज्यात किल्ल्याच्या सुरक्षेसंबंधी काही महत्वाचे स्केच होते. त्यांच्या या स्केचेसमध्ये किल्ल्यातील गुप्त भुयारांचा उल्लेख आढळला. पण ही भुयारं अनेक वर्ष सापडली नाहीत. पण नेहमीच वैज्ञानिकांना हा प्रश्न होता की, दा विंची यांनी त्यांच्या स्केचमध्ये ही भुयारं का दाखवली? जी प्रत्यक्षात आहेतच नाहीत. मात्र, आता ही गुप्त भुयारं सापडली आहेत.

या भुयारी मार्गांचा मुख्य उद्देश किल्ल्याशी सुरक्षेसंबंधी असू शकतो. अभ्यासकांचं मत आहे की, ही भुयारं दुश्मनांवर नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आली होती. किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था खूप अवघड होती, त्यामुळे काही रस्त्यांबाबत गुप्तता ठेवण्यात आली होती.

आज स्फोर्जा किल्ला एक पर्यटन स्थळ बनला आहे आणि इथे तीन म्युझिअम आहेत. पण अजूनही नव्यानं शोधण्यात आलेले भुयारी मार्ग अजून लोकांसाठी खुली करण्यात आलेली नाहीत.