ना बसायला सीट, ना डोक्यावर छप्पर; तरीपण अनेकजण करतात या धोकादायक ट्रेनने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 08:18 PM2022-07-18T20:18:22+5:302022-07-18T20:24:55+5:30

200 हून अधिक डबे असलेली ट्रेन सहारा वाळवंटात 704 किलोमीटरचा प्रवास करते.

जगात अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या ट्रेन आहेत, ज्या आपल्या वेगळेपणासाठी ओळखल्या जातात. पण एक अशी ट्रेनदेखील आहे, ज्यामध्ये प्रवास करणे अतिशय धोकादायक मानले जाते. ही प्रवासी ट्रेन नसून, एक मालगाडी आहे. तरी अनेकजण जीव धोक्यात घालून या ट्रेनमधून प्रवास करतात. या ट्रेनच्या बहुतांश डब्यांमध्ये ना बसायला जागा आहे ना टॉयलेट.

ही ट्रेन मॉरिटानिया या आफ्रिकन देशात धावते. 'ट्रेन डू डेझर्ट' असे या ट्रेनचे नाव असून, 1963 मध्ये याची सुरू झाली. ट्रेन सहारा वाळवंटातून जाते. या ट्रेनला 704 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 20 तास लागतात. या ट्रेनची लांबी 2 किलोमीटर असून, 3 ते 4 डिझेल इंजिन ट्रेनचे डब्बे ओढतात.

दोन किलोमीटर लांब ट्रेन मॉरिटानियाच्या नौआधिबू आणि झुएरत शहरांदरम्यान धावते. ही ट्रेन खाणीतून लोखंड वगैरे वाहून नेण्यासाठी धावते, परंतु अनेक लोक जीवावर खेळून त्यात प्रवास करतात. या ट्रेनमध्ये 200 ते 210 मालवाहू डबे बसवण्यात आले आहेत. एक डबा प्रवाशांसाठी आहे, परंतु अनेक लोक मालाच्या डब्यावर बसूनच कठीण प्रवास करतात.

आफ्रिकन देशातील वाळवंटी समाजातील लोकही या ट्रेनमध्ये प्रवास करतात. मॉरिटानियाची राजधानी नौकचॉट येथे जाण्यासाठी लोक या ट्रेनचा वापर करतात. या ट्रेनमुळे 500 किलोमीटरचे अंतर कमी होते.

यामुळेच मॉरिटानिया देशात राहणारे लोक त्यांच्या प्रवासासाठी ही ट्रेन निवडतात. त्या लोकांसाठी ही ट्रेन एखाद्या लाईफलाईनसारखी आहे. कामासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी या ट्रेनचा वापर होतो.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या मालगाडीने प्रवास करणाऱ्या लोकांना कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. ट्रेनमधील प्रवासादरम्यान प्रवाशांना 49 अंश सेल्सिअस तापमानाचा त्रास सहन करावा लागतो. तसेच, रात्रीचे तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खालीही जाते.