टायटॅनिकपेक्षा पाचपट मोठे जहाज; एकाचवेळी 10 हजार लोक करू शकतील प्रवास, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 07:31 PM2023-08-09T19:31:44+5:302023-08-09T19:35:54+5:30

रॉयल कॅरेबियनचे 'आयकॉन ऑफ द सीज' लवकरच प्रवासावर निघणार असून, यासाठी बुकिंगही सुरू झाले आहे.

तुम्ही अनेकदा 'टायटॅनिक' जहाजाचे नाव ऐकले असेल, यावरील चित्रपटही पाहिला असेल. त्याकाळी टायटॅनिक जगातील सर्वात मोठे जहाज होते. पण, कालांत्तराने टायटॅनिकपेक्षाही मोठे जहाज बनवण्यात आले. सध्या रॉयल कॅरिबियनची नवीन क्रूझ 'आयकॉन ऑफ द सीज' ची चर्चा होत आहे. हे शाही जहाज समुद्रात उतरण्यासाठी सज्ज झाले असून, फिनलंडच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरील तुर्कू शिपयार्डमध्ये याचे अंतिम काम सुरू आहे.

हे जहाज टायटॅनिकपेक्षा जवळपास पाचपट मोठे असून, जगातील सर्वात मोठे जहाज असल्याचा दावा कंपनीने केला आहे. समुद्रात उतरताच हे जगातील सर्वात मोठे क्रुझ जहाज असणार आहे. जानेवारी 2024 मध्ये ही क्रूझ आपल्या पहिल्या प्रवासाला निघण्याची शक्यता आहे. रॉयल कॅरिबियन वेबसाइटनुसार, आयकॉन ऑफ द सीजवर प्रवासासाठी बुकिंग सुरू झाले आहे.

हे जहाज फ्लोरिडातील मियामी बीचवरुन निघून कॅरिबियन बेटावर जाईल. यामध्ये प्रवाशांना 1958 अमेरिकन डॉलरपासून चार प्रकारची पॅकेजेस ऑफर केली जात आहेत. शिपयार्डमध्ये जहाजाचे काम पूर्ण करण्यात गुंतलेल्या शिपबिल्डर कंपनीचे सीईओ टिम मेयर यांनी दावा केला आहे की हे जगातील सर्वात मोठे आणि भव्य जहाज आहे.

आयकॉन ऑफ द सीजवर 20 हून अधिक डेक आहेत, जे एकाच वेळी सुमारे दहा हजार लोकांचा भार घेऊ शकतात. या जहाजाला एक मोठा काचेचा घुमट देखील आहे, जो जहाजाच्या पुढच्या भागाला अतिशय आकर्षक बनवतो. या विशाल जहाजाची बांधणी 2021 मध्ये सुरू झाली होती. या वर्षी जूनमध्ये समुद्रात त्याची चाचणी घेण्यात आली, जी पूर्णपणे यशस्वी ठरली.

आयकॉन ऑफ द सीज जहाज आपल्यासोबत 2.50 हजार 800 टन भार वाहून नेऊ शकते. याचा आकार टायटॅनिकच्या पाचपट असल्याचा दावा कंपनीने केला आहे. समुद्रात प्रवेश करताच, हे रॉयल कॅरिबियनच्या वंडर ऑफ द सीसला मागे टाकेल. सध्या हे जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज आहे. यावर सात स्विमिंग पूल, एक पार्क, शॉपिंग मॉल, आइस स्केटिंग सुविधेसह इतर अनेक सुविधा आहेत.