Volodymyr Zelensky in America: मिशन झेलेन्स्की: युक्रेनबाहेर कसे गेले? रशियात खळबळ; अटलांटिकमधील युद्धनौकांनाही चकमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 02:50 PM2022-12-22T14:50:04+5:302022-12-22T14:56:04+5:30

Volodymyr Zelensky in America: युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की पहिल्यांदाच देशाबाहेर पडले आणि रशियात खळबळ उडाली.

रशियाने युक्रेनवर हल्ले करून आज ३०० दिवस पूर्ण झाले आहेत. एवढे दिवस देशातच असलेले युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की पहिल्यांदाच देशाबाहेर पडले आणि रशियात खळबळ उडाली. झेलेन्स्कींना संपविण्यासाठी रशियाने जंगजंग पछाडले आहे. परंतू, ते देशाबाहेर ते पण रशियाच्या अजस्त्र युद्धनौकांवरून निसटल्याने गुप्तचर यंत्रणांपासून कोणाला समजले कसे नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

झेलेन्स्की आज अमेरिकेत पोहोचले, तिथे त्यांनी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली आणि मोठी मदत मिळविली आहे. तसेच अमेरिकेच्या संसदेलाही त्यांनी संबोधित केले आहे. हे जगासाठी शॉकिंग होते, कारण असा काही प्लॅनच नव्हता. कोणताही कार्यक्रम ठरलेला नव्हता. अचानक झेलेन्स्की अमेरिकेत प्रकट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

झेलेन्स्कींना युक्रेनबाहेर नेण्यासाठी अमेरिकेने अत्यंत गोपनिय अशी मोहिम राबविली, ज्याची रशियाला खबर लागली नाही. नाटोसाठी हे एक खतरनाक मिशन होते. कारण झेलेन्क्सींना मारण्यासाठी रशिया काहीही करू शकत होते. यामुळेच बायडेन यांनी झेलेन्स्कींना नेण्यापूर्वी गुप्तचर विमानांसोबत लढाऊ विमाने पाठविली होती. याच टॉप सिक्रेट मिशनद्वारे अटलांटिक महासागरावरून झेलेन्स्कींना नेण्यात आले.

सुरुवातीला अमेरिकेची टेहळणी विमाने युक्रेन आणि पोलंडच्या आकाशात आली होती. त्य़ानंतर अमेरिकन हवाई दलाचे बोईंग सी-४० विमान पोलंडमध्ये दाखल झाले. पोलंडजवळच्या समुद्रातील युद्धनौकांवर अमेरिकेची लढाऊ विमाने आधीपासूनच तैनात होती. ती आकाशात झेपावली. गेल्या ३०० दिवसांपासून या विमानांची या भागात गस्त सुरु असते. त्याचा फायदा अमेरिकेने उचलला.

अमेरिकेने बोईंगच्या उड्डाणापुर्वी एक तास आधी टेहळणी विमान जर्मनीहून अवाक्सला पाठविले. अमेरिकेला रशियाचा समुद्रात गस्त घालणाऱ्या युद्धनौकांची भीती सतावत होती. लढाऊ विमाने पोलंडच्या सीमेवर उडत होती. बोईंग युक्रेनहून हवेत झेपावले आणि पोलंडच्या सीमेत गेले. धोक्याचा एक टप्पा पार झाला होता. दुसरा टप्पा युरोपवरून नंतर समुद्रावरून होता.

अमेरिकेची आणखी काही लढाऊ विमाने ब्रिटनच्या एअरबेसवर आदेशाची वाट पाहत होती. एअरफोर्सचे एक विमान येणार आहे, त्याला सुरक्षा द्यायची आहे, एवढेच त्यांना सांगितले गेले होते. परंतू हायअलर्टवरही ठेवण्यात आले होते. पोलंडहून झेलेन्स्कींचे विमान ब्रिटनच्या आकाशात गेले. तिथे ते लोकांना आकाशातून उडताना दिसले परंतू नंतर जे गायब झाले ते थेट अमेरिकेतच दिसले.

झेलेन्स्कींच्या विमानाने जेव्हा स्कॉटलंडची सीमा ओलांडली तेव्हा एफ १५ लढाऊ विमाने मागे परतली. परंतू, अवाक्स विमानांनी झेलेन्स्कींच्या विमानाला घेरले होते. त्या विमानांनी झेलेन्स्की यांचे विमान अमेरिकेत सुखरूप नेऊन पोहोचविले. स्कॉटलंडची सीमा ओलांडल्यानंतर खाली निळाशार समुद्र आणि रशियाच्या युद्धनौका होत्या.

झेलेन्स्की यांनी मी अमेरिकेच्या वाटेवर असल्याची घोषणा केली, याबरोबर युरोपसह जगभरातून हजारोंच्या संख्येने लोकांनी झेलेन्स्की यांचे विमान ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. यात रशियाही होता. परंतू तोवर झेलेन्स्की यांचे विमान व्हाईट हाऊसपासून अवघ्या ३० किमीवर असलेल्या हवाई दलाच्या अँड्रीव बेसवर पोहोचले होते.