विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:53 IST2025-10-08T10:38:17+5:302025-10-08T10:53:33+5:30

टॅरिफ आणि एच वन बी व्हिसा यावरून भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढला असताना आता अमेरिकेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीक वाढल्याचं दिसून येते. त्यातच आता या दोन्ही देशांमध्ये मिसाइल डिफेन्स डील झाल्याचं बोललं जाते.
अमेरिका पाकिस्तानला AIM 120 ही अत्याधुनिक मध्यम रेंजची हवेतून हवेत मारा करणारी मिसाइल देण्याची शक्यता आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या युद्ध मंत्रालयाकडून अलीकडेच नोंदणी केलेल्या शस्त्र करारात AIM 120 AMRAAM खरेदीदारांमध्ये पाकिस्तानच्या नावाचा समावेश आहे.
या नोटिफिकेशनमध्ये ब्रिटन, पोलँड, पाकिस्तान, जर्मनी, फिनलँड, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, कतार, ओमान, कोरिया, यूनान, पोर्तुगाल, सिंगापूर, नेदरलँड, जपान, डेनमार्क, कॅनडा, बेल्झियम, बहरीन, सौदी अरेबिया, इटली, नॉर्वे, स्पेन, कुवेत, फिनलँड, तुर्की यासारख्या प्रमुख देशांचा समावेश आहे.
अद्याप हे स्पष्ट नाही की, पाकिस्तानला अमेरिकेकडून किती नव्या AMRAAM मिसाइल मिळतील, परंतु ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने F 16 लढाऊ विमाने आणखी अपग्रेड होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
ही डील अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर समोर आली आहे. बैठकीत ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावल्याचं म्हटलं होते.
अमेरिका पाकिस्तानसोबतच्या या करारानंतर चीन आणि रशिया यांचा प्रभाव संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करू शकते, ही डील पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील नवीन राजनैतिक जवळकीचे संकेत देत आहे असं संरक्षण तज्ज्ञांनी सांगितले आहे.
या मिसाइल करारानंतर पाकिस्तान त्यांच्या हवाई ताफ्यातील F 16 लढाऊ विमानात लवकरच बदल करू शकते असा अंदाज लावला जात आहे. AIM 120 AMRAAM मिसाइल एफ १६ विमानांसोबत वापरल्या जाऊ शकतात. फ्रेब्रुवारी २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या हवाई संघर्षात पाकिस्तानने भारताच्या विमानांवर याच मिसाइलचा वापर केला होता. आता हा करार F 16 विमानांची मारक क्षमता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
AIM 120CB अमेरिकेची AIM 120D मिसाइलचं नवीन व्हर्जन आहे. ही मध्यम रेंजमध्ये हवेतून हवेत मारा करणारी मिसाइल आहे. ज्याला रेथियॉन कंपनीनं बनवले आहे. या मिसाइलची रेंज १६० ते १८० किमीपर्यंत आहे. मॅक ४ म्हणजे आवाजाच्या गतीपेक्षा चार पटीने वेगवान आहे. एक्टिव्ह रडार सिस्टमच्या मदतीने ती सटीक लक्ष्य साधू शकते. एकाच वेळी अनेक हवाई हल्ल्यांना टार्गेट करू शकते.
अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील ही डील भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. पाकिस्तानला AIM 120 मिसाइल आणि F 16 अपग्रेड मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलात मोठी सुधारणा होईल. त्यामुळे भारतासाठी ही डील चिंताजनक आहे.
परंतु भारताकडे याआधीच राफेल आणि सुखोई ३० MKI सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत. ज्यात Meteor मिसाइलचा वापर होतो. परंतु पाकिस्तान अमेरिकेतील होणारी संभाव्य डील प्रादेशिक शांतता भंग करून नवीन तणाव निर्माण करू शकते.