पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 07:19 PM2022-09-14T19:19:23+5:302022-09-14T19:24:22+5:30

Pakistan-India: दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी पाकिस्तान जगभर कुप्रसिद्ध आहे, पण आता हा ठपका काढण्यासाठी पाकिस्तान नवीन डाव खेळत आहे.

JeM chief Maulana Masood Azhar: कुख्यात दहशतवादी मसूद अजहर पाकिस्तानात आहे, भारताने अनेकदा याचे पुरावेही दिले आहेत. पण, पाकिस्ताने सातत्याने अजहर पाकमध्ये असल्याचे नाकारले आहे. यातच आता स्वतःवरील दहशतवादी देशाचा ठपका पुसण्यासाठी पाकिस्तानने एक केवीलवाणा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने SCOच्या बैठकीपूर्वी अफगाणिस्तानला पत्र लिहून मसूद अजहरच्या अटकेची मागणी केली आहे.

दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश, अशी पाकिस्तानची ओळख आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून स्वतःवरील दहशतवादाचा ठपका पुसण्यासाठी पाकिस्तान अनेक प्रयत्न करत आहेत. आता पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारला एक पत्र लिहिले आहे, ज्यात पाक सरकारने कुख्यात दहशतवादी आणि मुंबईतील 26/11 हल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहरच्या अटकेची मागणी केली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने याला निव्वळ ढोंगीपणा म्हटले आहे.

जानकार आलोक बंसल सांगतात की, आंतरराष्ट्रीय वॉचडॉग फायनेंशियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट'मधून बाहेर काढण्याचा विचार करत आहे. यामुळेच आता पाकिस्तान स्वतःला दहशतवादविरोधी देश म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून पाकिस्तानने मसूद अजहरच्या अटकेची मागणी केली आहे. यापूर्वी पाकने FATF च्या दबावामुळे लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेशनल कमांडर साजिद मीरवर कारवाई केली होती. विशेष म्हणजे, पाकिस्तान साजिदला आतापर्यंत मृत म्हणायचा.

लष्कर-ए-तैयबाने दोन दशकांत अनेक वेळा आपले नाव बदलले असून, संघटना पाकिस्तानमध्ये अॅक्टिव्ह आहे. काही काळ ते 'जमाद-उद-दावा' म्हणून ओळखले जात होते. पण जेव्हा त्यावर बंदी घातली गेली तेव्हा 'फलाह-ए इन्सानियत फाउंडेशन'च्या नावाने ते काम करू लागले. जेव्हा ही संस्थादेखील चौकशीच्या फेऱ्यात आली, तेव्हा त्याचे नाव बदलून 'अल्लाह हु अकबर तहरीर' करण्यात आले.

पाकिस्तानच्या पत्राचा हा डाव असाच समोर आलेला नाही, यामागे मोठे कारण आहे. पाकिस्तानवर नजर ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय देखरेख संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर संस्थेचा खूप दबाव आहे.

या दबावाचा अंदाज यावरून लावता येतो की FATF टीमने अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली होती, ज्यामध्ये पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यासाठी उचललेली पावले अपुरी असल्याचे वर्णन केले होते. ऑक्टोबरमध्ये, FATF ची बैठक 18-21 ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानचे नाव ग्रे लिस्टमधून वगळण्याबाबत निर्णय होणार आहे.

पाकिस्तानला भेट देणाऱ्या FATF अधिकाऱ्यांनी दहशतवादाविरोधात पाकिस्तानची कारवाई अपुरी असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळेच पाकिस्तानने मसूद अझहरला अटक करण्यासाठी पत्र लिहिण्याचे नाटक केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान मसूदच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही, हे पाकिस्तानला चांगले ठाऊक असल्यामुळे मसूदला वाचवण्याच्या कटाचा हा भाग असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

मसूदनेही जैशच्या माध्यमातून अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. इस्लामाबादस्थित स्वतंत्र थिंक टँक ट्रान्सफॉर्मेशनने प्रकाशित केलेल्या शोधनिबंधानुसार, 2008 पासून FATF ग्रेलिस्टमध्ये असल्यामुळे पाकिस्तानला $38 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.

आयएमएफकडून कर्ज मिळाल्यानंतरही पाकची अवस्था खालावतच गेली. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे या खोट्या शोशिवाय पर्याय नाही. SCO ची बैठक 15-16 सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे होणार आहे. या बैठकीत भारत दहशतवादाविरोधातील कारवाईचा मुद्दा उपस्थित करू शकतो. त्यामुळेच पाकिस्तानने ही अझहरच्या अटकेची मागणी केली आहे.