'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:46 IST2025-08-22T17:40:52+5:302025-08-22T17:46:21+5:30

जगातील सर्वात मोठे खारट सरोवर म्हणून ओळखला जाणारा 'कॅस्पियन समुद्र' वेगाने आकुंचन पावत आहे. अझरबैजानी अधिकाऱ्यांनी याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मागील ५ वर्षात या पाण्याची पातळी ०.९३ मीटर म्हणजे ३ फूट कमी झाली आहे. ही पातळी दरवर्षी २०-३० सेंटीमीटर वेगाने घसरत आहे.

या आकुंचन पावणाऱ्या समुद्राचा केवळ तेल वाहतूक आणि बंदरांवर परिणाम होत नाही तर स्टर्जन मासे आणि कॅस्पियन सील सारख्या प्रजाती देखील धोक्यात आहेत. अझरबैजानचे उप पर्यावरण मंत्री रौफ हाजीयेव यांनी या संकटाचे वर्णन आर्थिक आणि पर्यावरणीय आपत्ती म्हणून केले आहे.

कॅस्पियन समुद्र हा अझरबैजान, इराण, कझाकिस्तान, रशिया आणि तुर्कमेनिस्तान अशा पाच देशांनी वेढलेला आहे. हा जगातील सर्वात मोठा बंदिस्त जलाशय आहे. ज्याला खारट सरोवर म्हणतात. त्याची खोली आणि भव्यता त्याला तेल आणि वायू साठ्यांचे केंद्र बनवते.

याशिवाय हे स्टर्जन माशांचे घर आहे, ज्यांच्या कॅविअर (अंडी) ला जगभरात मोठी मागणी आहे. कॅस्पियन सील सारख्या अद्वितीय प्रजाती देखील येथे आढळतात. परंतु आता हा समुद्र वेगाने आकुंचन पावत आहे, ज्याचा या देशांच्या स्थानिक लोकांच्या अर्थव्यवस्थेवर, पर्यावरणावर आणि जीवनावर खोलवर परिणाम होत आहे.

काय आहे २ प्रमुख कारणे? - वाढते तापमान आणि कमी पाऊस यामुळे समुद्रात पाण्याचा प्रवाह कमी होत आहे. समुद्राला ८०% पाणीपुरवठा करणाऱ्या व्होल्गा नदीचे प्रमाणही कमी झाले आहे.

व्होल्गा नदीवर धरण - रशियाने व्होल्गा नदीवर ४० धरणे बांधली आहेत. आणखी १८ धरणे बांधली जात आहेत. ही धरणे वीज आणि सिंचनासाठी पाणी अडवत आहेत, ज्यामुळे पाणी समुद्रापर्यंत पोहोचत नाही असं अझरबैजानचे म्हणणे आहे.

मात्र रशिया या समस्येसाठी हवामान बदलाचा हवाला देतो. तेलमन झैनालोव्ह आणि प्योत्र बुखारित्सिन सारखे काही शास्त्रज्ञ मानतात की, समुद्राच्या पातळीतील चढउतार नैसर्गिक आणि वातावरणीय बदल आहेत. परंतु हवामान बदल आणि नद्यांचा अतिरेकी वापर या संकटाला आणखी वाढवत आहेत असं कझाकिस्तानचे पर्यावरण तज्ञ किरील ओसिन यांचा आरोप आहे.

कॅस्पियन समुद्राच्या आकुंचनाचा सर्वात मोठा परिणाम तेल आणि वायूवर अवलंबून असलेल्या अझरबैजानच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने जहाजांना बाकू बंदरात ये-जा करण्यात अडचण येत आहे असं बाकू आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचे संचालक एल्डर सालाखोव्ह यांनी सांगितले.

एप्रिल २०२५ मध्ये अझरबैजान-रशिया या दोन्ही देशांनी या समस्येवर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच भेट घेतली. सप्टेंबरमध्ये ऑनलाइन देखरेख कार्यक्रम सुरू करण्याची योजना आहे. कॅस्पियन समुद्र वाचवण्यासाठी उच्चस्तरीय शिखर परिषद बोलावण्याचा प्रस्ताव मांडला अझरबैजानचे मुख्तार बाबायेव यांनी मांडला. या परिषदेत समुद्राच्या पातळीवर चर्चा केली जाईल.

२१ व्या शतकाच्या अखेरीस कॅस्पियन समुद्राची पाण्याची पातळी ९ ते १८ मीटरने कमी होऊ शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जर असे झाले तर बंदरे आणि व्यापार मार्ग बंद होऊ शकतात. मासे आणि सील प्रजाती पूर्णपणे नामशेष होऊ शकतात. कॅस्पियन समुद्र अराल समुद्रासारखी पर्यावरणीय संकट बनू शकतो. अराल समुद्र जगातील चौथे सर्वात मोठे सरोवर होते, जे आता संपुष्टात आले आहे.