‘’सैनिकांनो, हायअलर्टवर राहा, युद्धाची तयारी करा,’’ शी जिंनपिंग यांचे आदेश

By बाळकृष्ण परब | Published: October 14, 2020 08:48 PM2020-10-14T20:48:28+5:302020-10-14T21:00:51+5:30

india china faceoff News : गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या सीमेवरील प्रत्येक देशाची कुरापत काढत चीनने आशिया खंडामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या सीमेवरील प्रत्येक देशाची कुरापत काढत चीनने आशिया खंडामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.

दरम्यान, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या सैनिकांना युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार जिनपिंग यांनी एक मिलिट्री बेसच्या केलेल्या दौऱ्यावेळी सैनिकांना सांगितले की, आपली पूर्ण बुद्धिमत्ता आणि ऊर्जा युद्धाच्या तयारीवर केंद्रित करा.

चीनच्या Xinhua या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार शी जिनपिंग यांनी मंगळवारी चीनच्या गुआंगडोंगमधील एका लष्करी तळाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सैनिकांना युद्धाची तयारी करण्याची सूचना केली. तसेच सैनिकांनी हायअलर्टच्या स्थितीत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शी जिनपिंग पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मरिन कॉप्सचे निरीक्षण करण्यासाठी आले होते. यावेळी जिनपिंग यांनी चीनच्या सैनिकांना शुद्ध आणि पूर्णपणे विश्वसनीय राहण्याचे आवाहन केले आहे.

चीनचे राज्य असलेल्या गुआंगडोंगमध्ये शी जिनपिंग यांच्या दौ्ऱ्याचा मुख्य उद्देश शेनझेन स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या ४० व्या वर्धापन दिनी त्यांच्या भाषणाच्या कार्यक्रमाचा होता. भारत, अमेरिका आणि तैवानसोबत चीनचे संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत.

सोमवारीच अमेरिकेने तैवानला तीन अॅडव्हान्स वेपन सिस्टीम देण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. तैवान हा आपला भाग असल्याचा चीनचा दावा आहे. दरम्यान, तैवानसोबतचा शस्त्रास्त्रांचा करार अमेरिकेने रद्द करावा, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.