पृथ्वीवर मानव केवळ काही वर्षांचा पाहुणा, त्यानंतर..., स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:45 IST2025-07-08T12:38:15+5:302025-07-08T12:45:55+5:30
Stephen Hawking News: स्टीफन हॉकिंग यांची गणना ही जगभतील आतापर्यंतच्या महान शास्त्रज्ञांमध्ये होते. त्यांच्यासारखा महान शास्त्रज्ञ जेव्हा एखादं भाकित करतो, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. दरम्यान, स्टिफन हॉकिंग यांनी आपल्या प्रचंड ज्ञानाद्वारे मिळवलेल्या माहितीमधून पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वाबाबत चिंताजनक असं भाकित केलं होतं.

स्टीफन हॉकिंग यांची गणना ही जगभतील आतापर्यंतच्या महान शास्त्रज्ञांमध्ये होते. त्यांच्यासारखा महान शास्त्रज्ञ जेव्हा एखादं भाकित करतो, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. दरम्यान, स्टिफन हॉकिंग यांनी आपल्या प्रचंड ज्ञानाद्वारे मिळवलेल्या माहितीमधून पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वाबाबत चिंताजनक असं भाकित केलं होतं.
विसाव्या शतकामधील प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ असलेल्या स्टीफन हॉकिंग यांनी मानवासाठी ब्रह्मांडातील अनेक रहस्यांचा उलगडा केला होता. एवढंच नाही तर पृथ्वीवरील मानवाच्या अनिश्चित भविष्याबाबतही त्यांनी भाष्य केले होते. २०१७ साली एका कार्यक्रमात त्यांनी मानवाच्या अस्तित्वाबात एक मोठा धोक्याचा इशारा दिला होता. सध्या मानवता अत्यंत धोकादायक वळणावर असून, आपण आपल्या वर्तनात बदल केला नाही, तर आपल्या ग्रहाचं भविष्य अंध:कारमय असेल, असे त्यांनी म्हटले होते.
स्टीफन हॉकिंग यांनी केलेल्या भाकितानुसार सन २०६० नंतर पृथ्वी राहण्यालायक राहणार नाही. याची त्यांनी दोन कारणं सांगितलं होती. त्यामधील पहिलं कारण होतं ते म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड वाढलेली लोकसंख्या आणि दुसरं कारण म्हणजे वातावरणात होणारे बदल. अशाच प्रकारे लोकसंख्या वाढत राहिली आणि आपण उर्जेचा अशाच प्रकारे वापर करत राहिलो तर पृथ्वीची अवस्था शुक्र ग्रहाप्रमाणे होईल, असे स्टीफन हॉकिंग यांचे म्हणणे होते.
स्टीफन हॉकिंग सांगायचे की, जर मानव अशाच प्रकारे वाटचाल करत राहिला तर त्याला विनाशाच्या मार्गावर जाण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. स्टीफन हॉकिंग यांची ही भविष्यवाणी संशोधकांकडून वारंवार देण्यात येणाऱ्या धोक्याच्या इशाऱ्यांवर आधारित होती. त्यामध्ये वेगाने होत असलेली तापमान वाढ, ऋतुचक्रात होत असलेले बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा होत असलेला ऱ्हास, यामुळे मानवाच्या अस्तित्वाबाबत चिंता निर्माण होत आहे.
दरम्यान, स्टिफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार मानवावर ओढवणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे फारक थोडा वेळ उरला आहे. त्यांनी सांगितले होते की, आपली पृथ्वी वास्तव्याच्यादृष्टीने पूर्णपणे अनुपयुक्त होण्यास ५७५ वर्षांहून कमीचा कालावधी उरला आहे. हे ऐकण्यासाठी थोडं विचित्र वाटेल मात्र त्याचा दुष्पभाव कमी करण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.