फेसबुकच्या बॅनवरून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भडकले, मोदींकडे मागितली मदत!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 19, 2021 03:29 PM2021-02-19T15:29:00+5:302021-02-19T15:39:42+5:30

आपण फेसबूक वादासंदर्भात गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशीही चर्चा केल्याचे स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी म्हटले आहे. (Facebook ban row Australian Prime minister Scott Morrison discussed situation with pm modi)

फेसबुकने ऑस्ट्रेलियातील युझर्सवर घातलेली बंदी लवकरात लवकर हटवावी आणि वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या व्यवसायिकांशी चर्चा करावी, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी म्हटले आहे. याच बरोबर, त्यांनी इतर देशही वृत्त शेअर करण्याच्या मोबदल्यात डिजिटल कंपन्यांकडून शुल्क वसूल करण्याच्या आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुसरण करू शकतात, असा इशाराही फेसबुकला दिला आहे.

यावेळी, आपण फेसबूक वादासंदर्भात गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केल्याचे मॉरिसन यांनी म्हटले आहे.

मॉरिसन म्हणाले, ते इंग्लंड, कॅनाडा आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांसोबत ऑस्ट्रेलियाच्या या प्रस्तावित कायद्यासंदर्भात चर्चा करत आहेत. 'ऑस्ट्रेलियाने जो निर्णय घेतला आहे, त्यात अनेक देशांना स्वारस्य आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या निर्णय अनेक देशांना स्वारस्य असल्याने, मी गूगल प्रमाणेच फेसबुकलाही आमंत्रित करतो, की त्यांनी चर्चा करावी. कारण, ऑस्ट्रेलियाने येथे जो निर्णय घेतला आहे, त्याचे अनुसरण पश्चिमेकडील अनेक देश करू शकतात,' हे फेसबुकला माहित आहे.

फेसबुकचा निर्णय म्हणजे धोका - पीएम मॉरिसन फेसबुकने गुरुवारी वृत्त शेअर करणे थांबविण्याचा घेतलेला निर्णय धोकादायक असल्याचे मॉरिसन यांनी म्हटले आहे. फेसबुकने गुरुवारी टोकाचा निर्णय घेत, ऑस्ट्रेलियात वृत्त शेअर करण्यावर बंदी घातली होती.

सोशल मिडिया कंपनीच्या या निर्णयामुळे सरकार, मीडिया आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांदरम्यान वाद वाढला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकवर वृत्त शेअर करण्याच्या मोबदल्यात माध्यम संस्थांना (सोशल मिडिया कंपनीद्वारे) शुल्क आकारण्यासंदर्भातील एका प्रस्तावित कायद्याविरोधात प्रत्युत्तराच्या स्वरुपात, या कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मॉरिसन म्हणाले, ‘काही साइट्स बंद करण्याचा विचार, जसे की त्यांनी काल केला, हा एक प्रकारचा धोका आहे. यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील लोकांची काय प्रतिक्रिया असेल, हे मला माहीत आहे. त्यांनी उचललेले हे पाऊल योग्य नव्हते, असे मला वाटते.’

ऑस्ट्रेलिया सरकारच्या या निर्णयानंतर फेसबुकने महामारी, सार्वजनिक आरोग्य आणि आपत्कालीन सेवांसंदर्भातील माहिती पोहोचविणेही थांबवले आहे. मात्र, हे तात्पूरत्या स्वरुपात करण्यात आले आहे. यासंदर्भात देशभरात फेसबुकवर टीकाही झाली.

फेसबुकने गुरुवारी घोषणा केली होती, की त्यांनी ऑस्ट्रेलियात बातम्या देण्याच्या मोबदल्यात शुल्क भरण्यासंदर्भातील प्रस्तावित कायद्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी आपल्या व्यासपीठावर बातम्या पाहण्याची, तसेच शेअर करण्याची सेवा बंद केली आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन.