मित्राची भाषा बदलली, त्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी चीनसोबत भारतावरही घणाघाती टीका केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 03:59 PM2020-07-30T15:59:49+5:302020-07-30T16:18:14+5:30

काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये तणाव विकोपाला गेल्यानंतर अमेरिका भारताची बाजू घेत भक्कमपणे उभी राहिली होती. मात्र आता ट्रम्प यांनी थेट भारताला टीकेचे लक्ष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये तणाव विकोपाला गेल्यानंतर अमेरिका भारताची बाजू घेत भक्कमपणे उभी राहिली होती. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला कठोर भाषेत इशारा दिला होता. मात्र या सर्व घटनांना काही दिवस उलटत नाहीत तोच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुद्द्यावरून चीनसह भारतावरही घणाघाती टीका केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदूषाच्या मुद्यावरून भारतावर टीकास्त्र सोडले आहे. भारत, चीन आणि रशिया हे देश आपल्या देशातील हवेबाबत अजिबात चिंता करत नाहीत. उटल अमेरिकेला आपल्या देशातील हवेची काळजी आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, ट्र्म्प यांनी यापूर्वीही प्रदूषणाच्या मुद्द्यावरून भारतावर जोरदार टीका केली होती.

दरम्यान, पॅरीस कराराचा उल्लेख करत हा करार एकतर्फी आणि ऊर्जा वाया घालवणारा होता, त्यामुळे आम्ही या करारामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले. या करारामधून भारतासह काही विकसनशील देशांना काही प्रमाणात सवलत देण्यात आलेली होती.

टेक्सास येथील कार्यक्रमामध्ये ट्रम्प म्हणाले की, पॅरीस करारातील निर्बंधांचे अनुकरण करून वॉशिंग्टनमधील डावे डेमोक्रॅट्स असंख्य अमेरिकी नोकऱ्या आणि कंपन्या चीन आणि त्याच्यासारख्या प्रदूषणकारी देशांना सोपवून मोकळे झाले असते. ही मंडळी आम्हाला अमेरिकेतील हवेची काळजी करण्याचा सल्ला देते. मात्र चीन आपल्याकडील हवेवर लक्ष देत नाही. तसेच भारतही काही चिंता करत नाही. मात्र मी राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत अमेरिका फर्स्ट हे धोरण कायम राहील.

पॅरिस ग्लोबल वॉर्मिंग करार हा विनाशकारी होता. त्यामुळे अमेरिकेला अब्जावधी डॉलरचा फटका बसला असता. जर आम्ही हा करार मान्य केला असता तर आम्ही प्रतिस्पर्धेच्या लायक राहिलो नसतो, आम्ही नोकऱ्या हिरावून घेणारा ओबामा सरकारचा पॉवर प्लॅन रद्द केला, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या ७० वर्षांत अमेरिका पहिल्यांदाच इंधन निर्यातक देश बनली आहे. अमेरिका आता तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात अमेरिका पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. आता भविष्यात आमची काय स्थिती असेल. हे आम्ही निश्चित करू असेही ट्रम्प यांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून यापूर्वीसुद्धा भारतावर टीका केली होती. भारत, चीन आणि रशिया उद्योगांमधून निघणाऱ्या धुराला प्रतिबंध करण्यासाठी काहीही करत नाही आहेत आणि समद्राच्या माध्यमातून या देशांमधील कचरा लॉस एंजेलिसपर्यंत पोहोचत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. जो तो अमेरिकेबाबत बोलतो. मात्र चीन आणि इतर विकसनशील देशांबाबत कुणी काही बोलत नाही.

चीन, भारत, रशिया आणि इतर अनेक देशांमध्ये ना साफ पाणी आहे ना स्वच्छ हवा आहे. तसेच स्वच्छतेबाबतही येथे समज दिसून येत नाही. काही शहरामध्ये तर तुम्ही श्वाससुद्धा घेऊ शकत नाही, असे ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते.

डिसेंबर २०१८ च्या ग्लोबल कार्बन प्रोजेक्टच्या अंदाजानुसार भारत जगातील कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन करणाऱ्या देशांच्या यादीत चौथा देश ठरला होता. २०१७ मध्ये जगातील कार्बनच्या उत्सर्जनात चीन (२७ टक्के), अमेरिका (१५ टक्के), यूरोपीय यूनियन (१० टक्के) आणि भारत (१० टक्के) या देशांचा वाटा सर्वाधिक होता.