Corona Virus : कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक; लस घेतलेल्या लोकांना जास्त धोका, रिसर्चमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 05:29 PM2023-01-19T17:29:47+5:302023-01-19T17:47:56+5:30

Corona Virus : जगभरात हाहाकार माजवणारा नवा व्हेरिएंट इतर प्रकारांपेक्षा लसीकरण केलेल्या लोकांवर आणि कोरोनाची लागण झालेल्या लोकांवर अधिक परिणाम करत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनाबाबत आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. जगभरात हाहाकार माजवणारा XBB.1.5 हा नवा व्हेरिएंट इतर प्रकारांपेक्षा लसीकरण केलेल्या लोकांवर आणि कोरोनाची लागण झालेल्या लोकांवर अधिक परिणाम करत आहे. एका नव्या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच 38 देशांमध्ये XBB.1.5 प्रकाराची प्रकरणे आढळून आली आहेत, ज्यामध्ये अमेरिकेतील 82 टक्के कोरोना प्रकरणांसाठी फक्त हा व्हेरिएंट जबाबदार आहे.

ब्रिटनमधील आठ टक्के आणि डेन्मार्कमधील दोन टक्के कोरोना केसेस या व्हेरिएंटमुळे आहेत. रिसर्चनुसार, या व्हेरिएंटमुळे लसीकरण झालेल्या किंवा यापूर्वी कोरोना झालेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.

XBB.1.5 स्ट्रेन Omicron XBB व्हेरिएंटच्या कुटुंबातील सदस्य आहे, जो Omicron BA.2.10.1 आणि BA.2.75 सब-व्हेरिएंट्सचं रिकॉम्बिनंट आहेत. अमेरिकेमध्ये 44 टक्के कोरोना प्रकरणांसाठी XBB आणि XBB.1.5 जबाबदार आहेत.

युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (ECDC) च्या मते, सध्या सब व्हेरिएंट अमेरिकेमध्ये इतर व्हेरिएंटपेक्षा 12.5 टक्के वेगाने पसरत आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 30 टक्के प्रकरणे या सब व्हेरिएंटची होती, जी सीडीसीने गेल्या आठवड्यात अंदाजित केलेल्या 27.6% पेक्षा जास्त आहे.

NYC डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड मेंटल हायजीनने केलेल्या एका रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, XBB.1.5 हा COVID-19 चा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे आणि इतर व्हेरिएंटमध्ये कोरोनाची लसीकरण झालेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे किंवा ज्यांना यापूर्वी कोरोना झाला आहे.

लसीकरणाला चालना देण्याचे आवाहन करून, ते म्हणाले, XBB.1.5 अधिक गंभीर रोग होऊ शकतो की नाही हे आम्हाला अद्याप माहीत नाही. म्हणूनच COVID-19 ची लस आणि बूस्टर डोससह स्वतःचे संरक्षण करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

तीन दिवसांपूर्वी INSACOG ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत कोरोनाच्या XBB.1.5 चे एकूण 26 रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट आतापर्यंत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सापडला आहे ज्यात दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळेच केरळ सरकारने राज्यात सर्वत्र मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे. याबाबत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

ज्या अंतर्गत सर्व लोकांना सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच, राज्य सरकारने लोकांना सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कोरोना संसर्गाचा प्रसार रोखता येईल.

सरकारच्या सूचनेनुसार, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची ही मार्गदर्शक तत्त्वे पुढील 30 दिवस राज्यात लागू राहतील. सर्व दुकाने, चित्रपटगृहे आणि विविध ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत.