CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; 1.3 कोटी लोकसंख्येच्या शहरात कडक लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:02 PM2021-12-24T12:02:24+5:302021-12-24T12:18:12+5:30

CoronaVirus Live Updates : चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 27 कोटींचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 278,535,792 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5,400,992 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 249,273,990 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.

चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने शियान शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

चीनमधील शियान शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे.

एक कोटी 30 लाख लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. कोरोनाचा धोका असल्याने अगदीच अत्यावश्यक कामासाठी शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठीही सरकारकडून विशेष परवाना जारी करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

चीनसमोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान आहे. फेब्रुवारी महिन्यात असणाऱ्या विंटर ऑलिपिक खेळांसाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू चीनमध्ये दाखल होणार आहेत.

चीन सध्या डेल्टा आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण तयारी करत असल्याचं चित्र दिसतं आहे. येथे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात असे आदेश देण्य़ात आले आहेत.

देशातील मुख्य शहरांमध्ये मोठ्या सभा आणि गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी तसेच प्रवासावर बंदी घालण्यासंदर्भातील निर्णयांवर विचार सुरू आहे. शियान शहरातून देशभरात संसर्ग होण्याची भीती आहे.

211 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. चीनच्या शंघाईजवळील झेजियांग प्रांतातील अनेक शहरांमध्ये देखील कोरोनाचा प्रसार होत आहे. तर कोरोनामुळे चीनमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंट हा अत्यंत वेगाने पसरत असून तो घातक असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकांना सतर्क करत धोक्याचा इशारा दिला आहे.

जगभरातील सरकारांनी आता कोरोना या महाभयंकर संकटाचा अंत करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. तसेच त्यासाठी नेमकं काय काय करणं गरजेचं आहे याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी 2022 या वर्षात आपण कोरोना नावाच्या या साथीच्या रोगाचा अंत केला पाहिजे. येत्या वर्षात अंत करायचा असल्यास, वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकसंख्येचं लसीकरण केले जाईल, याची खात्री करून ही असमानता संपवायला हवी असं म्हटलं आहे.

"जागतिक स्तरावर लसीकरण लक्ष्य साध्य करण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावेल" अशी आशा WHO प्रमुखांनी व्यक्त केली आहे. जगभरात या वर्षी तब्बल 3.3 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी साथीच्या रोगामुळे आपला जीव गमावला आहे असंही म्हटलं आहे,

"ओमायक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा जास्त पटीने होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच ज्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे आणि जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांना देखील ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे" असं म्हटलं आहे.