CoronaVirus: कोरोनावर बड्या-बड्या देशांना जमला नाही, असा करिश्मा छोट्याशा भूटाननं करून दाखवला; बघा, कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 02:27 PM2021-04-29T14:27:54+5:302021-04-29T14:36:50+5:30

या छोट्याशा देशाच्या यशाकडे जगातील सर्वच देश आश्चर्याने पाहत आहेत. या पाहाडी देशातील अनेक भाग तर असे आहेत, जेथे जाण्यासाठीही धड रस्तेही नाहीत. (Bhutan)

एकीकडे भारत कोरोनाच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे शेदारील देश भूटानने आपल्या 93 टक्के लोकांचे लसीकरण केले आहे. या छोट्याशा देशाच्या यशाकडे जगातील सर्वच देश आश्चर्याने पाहत आहेत. या पाहाडी देशातील अनेक भाग तर असे आहेत, जेथे जाण्यासाठीही धड रस्तेही नाहीत. बर्फाने भरलेल्या नद्या आणि उंच-उंच पहाडांनी घेरलेल्या या देशाने भारताकडून मोफत मिळालेल्या लशीपासून यशाची एक नवी कहाणीच लिहिली आहे. (CoronaVirus how Bhutan vaccinated 93 percent of adult population know about success story)

आतापर्यंत 93 टक्के वयस्क लोकांचे लसीकरण - भारताच्या सीरम इंस्टिट्यूटमध्ये तयार झालेली ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस गेल्या महिन्यात हेलीकॉप्टरने या देशात पोहोचली होती. यानंतर या देशाने लसीकरण सुरू करण्यासाठी संपूर्ण देशाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तैनात केले. या लोकांनी एका गावातून दुसऱ्या गावात कधी बर्फ तर कधी नद्या ओलांडून लसीकरणाचे काम सुरूच ठेवले. परिणामी या देशातील 93 टक्के वयस्क लोकांचे लसीकरण झाले आहे.

उंच पहाड आणि बर्फाने भरलेल्या नद्यांवरही केली मात - जगापासून काही अंशी तुटक असलेल्या भूटानमधील ग्रामीण भागातील लोकांना लसीकरणासाठी तयार करायलाही येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. येथील स्थानिक व्हॉलंटिअर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिसरातील प्रमुखांना सोबत घेऊन, येथील लोकांना समजावले. या लशीचे महत्व पटवून दिले.

मार्च अखेरीस सुरू झाले होते लसीकरण - या बौद्ध बहुल देशात गेल्या शनिवारपर्यंत 478,000 हून अधिक लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला होता. ही संख्या येथील एकूण लोकसंख्येच्या 60 टक्क्यांहून अधिक आहे.

तर, आता भूटानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या एकूण वयस्क लोकसंख्येच्या 93 टक्के लोकांना लशीचा किमान एक डोस दिला आहे.

मार्चच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, या देशात 1,200 लसीकरण केंद्रांवर लस पोहोचवण्यात आली होती.

लसीकरणाच्या बाबतीत भूटान जगात सव्या क्रमांकावर - न्यूयॉर्क टाइम्सच्या एका डेटाबेसनुसार, भूटानमध्ये शनिवारपर्यंत 100 पैकी 63 लोकांना लस देण्यात आली होती. कोरोना लसीकरणाचा हा दर जगात सहाव्या क्रमांकाचा आहे. अर्थात लसीकरणाच्या बाबतीत जगातील केवळ 5 देशच भूटानच्या पुढे आहेत. भूटानचा हा दर भारतापेक्षा सात पट आणि जागापेक्षा सहा पट अधिक आहे.

भूटानच्या आरोग्य मंत्र्यांनी राजा आणि जनतेला दिले श्रेय - भूटानचे आरोग्यमंत्री डेशो डेचेन वांगमो यांनी या यशाचे श्रेय देशाचे राजे आणि जनतेला दिले आहे. ते म्हणाले, येथील लोकांनी लसीकरणाला चांगल्या प्रकारे मदत केली. तसेच, राजांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण लसीकरण अभियान अत्यंत प्रभावीपणे चालले.

डेशो डेचेन वांगमो यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, केवळ 750,000 एवढीच लोकसंख्या असलेला छोटा देश असल्यानेच त्यांनी दोन आठवड्यात या आकड्याला स्पर्ष केला आहे.

भारताने मोफत दिल्या होत्या सर्व लशी - भूटानच्या लसीकरणातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, भूटानला सर्व लशी भारताने मोफत दिल्या होत्या. ही लस सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली आहे. भूटान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ते पहिल्या टप्प्यानंतर साधारणपणे 8 ते 12 आठवड्यांनंतर दुसरा डोस देण्याचा विचार करत आहेत.