Coronavirus China : चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार, ३५ दिवसांत ६० हजार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 09:04 AM2023-01-15T09:04:34+5:302023-01-15T09:10:19+5:30

Coronavirus China : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढत आहे. अशीच एक धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. यानुसार गेल्या ३५ दिवसांत चीनमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ६० हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चीन सरकारने कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने मृत्यूंची नोंद झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत चीनमध्ये एकूण ५९,९३८ मृत्यूंची नोंद झाली आहे. नॅशनल हेल्थ कमिशन अंतर्गत ब्युरो ऑफ मेडिकल अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख जिओ याहुई यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.

८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान कोविड-संबंधित ५९,९३८ मृत्यूंची नोंद झाली आहे. ही आकडेवारी फक्त त्या लोकांची आहे ज्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कोरोना विषाणूमुळे रेस्पिरेटली फेल्युअर झाल्यानं ५५०३ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ५४४३५ जणांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांना अन्य आजारही होते, असं त्यांनी सांगितलं.

डिसेंबर महिन्यात चीन सरकारनं झिरो कोविड पॉलिसी हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. दरम्यान, चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी हटवल्यानंतर मृतांची आकडेवारी कमी करण्याचा आरोपही करण्यात आला होता.

शनिवारी, चिनी आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की मृत्यू झालेल्यांचं सरासरी वय ८०.३ वर्षे आहे, ज्यात ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ९० टक्के लोकांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक जण इतर आजारांनी ग्रस्त होते. चीनमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाखो लोकांना लसीकरण करण्यात आलेले नाही.

चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीवर नजर ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांच्या म्हणण्यानुसार, शहरांमध्ये स्मशानभूमीबाहेर वाहनांची रांग आहे; गावात असे नाही, इथे लोक शवपेट्यांमध्ये मृतदेह घेऊन स्मशानभूमीबाहेर रांगा लावत आहेत.

८ जानेवारी रोजी चीनने तीन वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या सीमा खुल्या केल्या. तेव्हापासून ४ लाखांहून अधिक लोक चीनमध्ये आले आणि चीनमधून बाहेरच्या देशांमध्ये गेले.  २ लाख ४० हजार लोक चीनमधून अन्य देशांमध्ये गेले आहेत.