Hantavirus : काय आहे हंता व्हायरस आणि कसा पसरतो, जाणून घ्या लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 09:05 AM2020-03-25T09:05:09+5:302020-03-25T09:24:06+5:30

Hantavirus अमेरिकेत जो सर्वात घातक हंता व्हायरस आढळून येतो त्याचं नाव Sin Nombre आहे. हा व्हायरस उंदरांच्या एका खास प्रजातीपासून पसरतो.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लोक मृत्यूमुखी पडत असताना चीनमध्ये हंता व्हायरसने एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हंता हा तसा जुनाच व्हायरस असून याचे अनेक प्रकार असू शकतात. चीनमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू हंताने झाला ती व्यक्ती बसने प्रवास करत होती. हंता हा फार जुना व्हायरस समूह असून अनेकदा अमेरिकेतही या व्हायरसने लोक संक्रमित झाले आहेत.

अमेरिकेत जो सर्वात घातक हंता व्हायरस आढळून येतो त्याचं नाव Sin Nombre आहे. हा व्हायरस उंदरांच्या एका खास प्रजातीपासून पसरतो. उंदरांची ही प्रजाती म्हणजे Deer Mouse ही होय. यांच्यापासून हंता व्हायरस पल्मनेरी सिंड्रोम होऊ शकतो.

अमेरिकेत हंता व्हायरसला 'न्यू वर्ल्ड' म्हटलं जातं आणि व्हायरसचा आणखी एक प्रकार म्हणजे 'ओल्ड वर्ल्ड'. हा जास्तकरून यूरोप आणि आशियात आढळतो.

अमेरिकेत 1993 मध्ये हंता व्हायरसने होणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी हा व्हायरस अनेक भागांमध्ये पसरला होता. 1995 मध्ये अमेरिका सरकारने हंता व्हायरस पल्मनेरी सिंड्रोमला अशा यादीत टाकण्यात आलं होतं, ज्या आजारांची माहिती सरकारला देणं गरजेचं आहे.

ऑगस्ट 2012 मध्ये अमेरिकेच्या योसेमिते नॅशनल पार्कमध्ये फिरणाऱ्या लोकांना हंता व्हायरसचं संक्रमण झाल्याचं आढळून आलं होतं. नॅशनल पार्क सर्व्हिसने त्यावेळी कमीत कमीत कमी 10 लोकांमध्ये हा व्हायरस आढळून आल्याचं सांगितलं होतं. 2017 मध्येही 17 लोकांना याची लागण झाली होती.

सीडीसीच्या रिपोर्टनुसार, हंता व्हायरस हा उंदारांपासून पसरतो. जर एखादी व्यक्ती उंदरांच्या मल-मूत्राला स्पर्श करते आणि चेहऱ्याला हात लावत असेल तर हंता व्हायरसने ती व्यक्ती संक्रमित होण्याचा धोका असतो.

मात्र, सामान्यपणे हंता व्हायरस हा एक व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरत नाही. हंता व्हायरसची माहिती मिळवण्यासाठी एक ते आठ आठवड्यांचा वेळ लागतो.

जर एखादी व्यक्ती हंता व्हायरसने संक्रमित झाली असेल तर त्या व्यक्तीला ताप, अंगदुखी, सर्दी, उलटी अशा समस्या होतात. हंता व्हायरसने संक्रमित व्यक्तीची स्थिती बिघडली तर त्यांच्या फुप्फुसात पाणी भरू लागतं आणि त्यांना श्वास घेण्यास समस्या होते.

जानेवारी 2019 मध्ये हंताने संक्रमित 9 लोकांचा पेटागोनियामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर पर्यटकांना सूचना देण्यात आल्या होत्या. एका अंदाजानुसार, त्यावेळी या व्हायरसने लागण झालेल्या 60 केसेस समोर आल्य होत्या.

ज्यातील 50 लोकांना क्वारेंटाईन ठेवण्यात आलं होतं. सीडीसीनुसार, हंता व्हायरसचा मृत्यूदर हा 38 टक्के असतो आणि या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही.

या व्हायरसची लागण झाल्यावर व्यक्तीला 100 च्या वर ताप येतो. भारतही या व्हायरसपासून दूर नाही. 2008 आणि 2016 मध्ये या व्हायरसची लागण भारतात झाली होती.