नव्या वर्षात मुलांच्या फिटनेसची घ्या काळजी; पालकांसाठी काही टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:36 PM2019-01-04T18:36:35+5:302019-01-04T18:40:56+5:30

2019मध्ये तुमच्या मुलांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आज काही खास टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमच्या मुलांचे आरोग्य उत्तम राखण्यासोबतच आजारांपासून रक्षण होण्यासही मदत होईल.

मुलांच्या रात्रीच्या जेवणाची वेळा निश्चित करा. जेवम झाल्यानंतर त्यांना लवकर झोपण्याची सवय लावा. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय लागेल. मुलांचा दिनक्रम असा सेट झाल्यामुळे त्यांचा मूड दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होईल. मुलांनी कमीतकमी 8 तासांची शांत झोप घेणं आवश्यक आहे.

जर मुलं खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूप नाटकं करत असेल तर त्यांच्यासाठी ते पदार्थ तयार करा जे त्यांना सर्वाधिक आवडतात. परंतु ते पदार्थ पौष्टिक असतील याकडे लक्ष द्या.

आजकालची मुलं सध्या घरी तयार केलेल्या पदार्थांपासून दूर पळतात आणि दिवसभर पिझ्झा, बर्गर, चिप्स यांसारखे जंक फूड खातात. ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांना शक्य तेवढं जंक फूडपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

मुलांना दिवसभरात कमीत कमी 6 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावा. पाण्यामध्ये ग्लूकॉन-डी एकत्र करून प्यायला दिलं तरी चालेल. जर मुल पाणी पिण्यास नकार देत असेल तर त्यांना ज्यूस, सरबत यांसारखी पेय पिण्यासाठी द्या.