Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:22 IST2026-01-07T20:18:33+5:302026-01-07T20:22:49+5:30
Health Tips: आपण अनेकदा घाईघाईत गाडीत पाण्याची बाटली विसरतो आणि तहान लागल्यावर तीच बाटली उघडून पाणी पितो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे पाणी तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे?

प्रवासादरम्यान आपण अनेकदा गाडीत पाण्याची बाटली ठेवतो आणि तहान लागल्यावर तेच पाणी पितो. मात्र, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन व्होरा यांनी सोशल मीडियाद्वारे एक महत्त्वपूर्ण इशारा दिला असून, गाडीत दीर्घकाळ राहिलेले पाणी का पिऊ नये, याचे वैज्ञानिक कारण स्पष्ट केले आहे.

डॉ. मनन यांच्या मते, जेव्हा आपण गाडी उन्हात उभी करतो, तेव्हा गाडीच्या आतील तापमान बाहेरील तापमानापेक्षा कितीतरी पटीने वाढते. या अति उष्णतेमुळे प्लास्टिकच्या बाटलीतील रासायनिक घटक हळूहळू पाण्यात विरघळू लागतात. प्लास्टिकमध्ये असलेली हानिकारक रसायने थेट शरीरात गेल्यामुळे गंभीर आजारांना निमंत्रण मिळते.

डॉक्टरांनी स्पष्ट केले की, उन्हात तापलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. प्लास्टिकमधील रसायने शरीरातील हार्मोन्सच्या सिस्टीमवर विपरीत परिणाम करतात. यामुळे पोटदुखी आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात. दीर्घकाळ अशा पाण्याचे सेवन केल्यास डोकेदुखी आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

अनेकांना वाटते की ब्रँडेड मिनरल वॉटरच्या बाटल्या सुरक्षित असतात. मात्र, डॉ. मनन यांनी स्पष्ट केले की, बाटली कोणत्याही ब्रँडची असली तरी ती शेवटी प्लास्टिकचीच असते. प्लास्टिकला उष्णता लागली की त्यातील घातक घटक पाण्यात मिसळणे अटळ आहे. त्यामुळे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर असले तरी ते तापलेल्या गाडीत ठेवलेले असेल तर पिणे टाळावे.

डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. त्यामुळे पुढच्या वेळी गाडीतील बाटली उचलताना दहा वेळा विचार करा!

















