हायप्रोटीनने सिक्स पॅक बॉडी बनणार, पण त्याचे दुष्परिणाम माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:10 IST2026-03-27T17:26:50+5:302026-03-27T18:10:28+5:30

फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगचा ट्रेंड वाढत असताना प्रोटीन पावडर आणि सप्लिमेंट्सचा वापर झपाट्याने वाढतो आहे. प्रथिने शरीरासाठी आवश्यक असली तरी त्याचे अतिसेवन आरोग्यास घातक ठरू शकते. विशेषतः किडनीवर याचा गंभीर परिणाम होतो.

मानवी आरोग्यात प्रथिनांचे महत्व - प्रथिने शरीराच्या वाढीसाठी व उतकांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. स्नायू, त्वचा, केस आणि हार्मोन्ससाठी महत्त्वाचे घटक तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते. त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीतही महत्त्वाचे योगदान आहे.

बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन सेवनाचे प्रमाण वाढले - जीम करणाऱ्यांमध्ये हाय-प्रोटीन डाएटचा ट्रेंड आहे. स्नायू लवकर वाढवण्यासाठी जास्त प्रथिनांचा वापर होत आहे. सोशल मीडिया आणि फिटनेस इन्फ्लुएन्सरचा प्रभाव आहे. तसेच नैसर्गिक आहाराऐवजी सप्लिमेंट्सकडे झुकाव दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रोटीन पावडर, प्रोटीन शेकचा अतिवापर - गरजेपेक्षा जास्त प्रोटीन पावडर सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच डॉक्टरांचा सल्ला न घेता देखील अशी पावडर घेतली जात आहे. त्यामुळे काही सप्लिमेंट्समध्ये स्टेरॉइड्स किंवा हानिकारक घटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे याचे दुष्परिणाम वाढतात.

उर्वरित शरीरालाही काय अपाय ? - पचन बिघडते, गॅस, बद्धकोष्ठता, डिहायड्रेशन, लिव्हरवरही ताण येतो. वजनात असंतुलित वाढ किंवा फॅट जमा होणे.

ही लक्षणे दिसताच सावध व्हा - सतत थकवा, लघवीचे प्रमाण किंवा रंग बदलणे, हात-पाय, चेहऱ्यावर सुज येणे, पोटदुखी, उलट्या, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे.

प्रथिनांसाठी उत्तम पर्याय कुठले? - शाकाहारी, डाळी, कडधान्ये, मूग, हरभरा, मसूर, दूध, दही, पनीर, सोयाबीन, टोफू, सुकामेवा बदाम, अक्रोड खावे. मर्यादित प्रमाणात अंडी, चिकन, मासे हे खावे.

किडनीवर काय होतो परिणाम? - जास्त प्रथिनांमुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो. युरिया व क्रिएटिनिनचे प्रमाण वाढते, किडनी फंक्शन कमी होण्याचा धोका निर्माण होतो. किडनी आजार असणाऱ्यांसाठी अधिक धोकादायक आहे.

आहारतज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला घ्या - आपल्या शरीराच्या गरजेनुसारच प्रथिनांचे सेवन करा, सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच नियमित तपासणी करून घ्या, संतुलित आहार आणि व्यायाम यालाच प्राधान्य देणे गरजेचे.