CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनानंतर कोणतीही लक्षणं न दिसता 70 टक्के काम करणं बंद करतेय किडनी; रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 04:17 PM2021-09-11T16:17:25+5:302021-09-11T16:41:15+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची चिंता वाढली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने 22 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णसंख्या 224,746,413 वर पोहोचली आहे. तर 4,632,644 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशातही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या तीन कोटींवर गेली आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे काही राज्यात अद्यापही परिस्थिती चिंताजनक आहे. लोकांमध्ये वेगाने पसरणाऱ्या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची चिंता वाढली आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनासंदर्भात जगभरात विविध ठिकाणी रिसर्च केले जात आहेत. रिसर्चमधून नवनवीन माहिती सातत्याने समोर येत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनातून बरं झाल्यावर किडनीवर परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे.

कोणतीही लक्षणं न दिसता किडनी 70 टक्के काम करणं बंद करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. जर्नल ऑफ दी अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (Journal of the American Society of Nephrology) या जर्नलमध्ये या नव्या संशोधनाबद्दलचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात जावं लागलेल्या किंवा कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणं दिसलेल्या रुग्णांनाही किडनीशी संबंधित समस्या जाणवत असल्याचं दिसून आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या रुग्णांना या समस्या जाणवत असल्याचं म्हटलं आहे.

समस्यांवर लवकर उपचार केले गेले नाहीत, तर किडनीचा गंभीर विकार होऊ शकतो, असा इशाराही रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. किडनी निकामी झाली, तर शरीरातल्या अन्य अवयवांवरही विपरीत परिणाम होतो, असं अनेक विशेषज्ञांनी म्हटलं आहे.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) रिसर्चमधून असं दिसून आलं आहे, की किडनी निकामी होण्याची समस्या अशा रुग्णांमध्ये वाढत चालल्याचं दिसून येत आहे. मात्र त्याची लक्षणं दिसून येत नाहीत. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

आपली किडनी योग्य पद्धतीने काम करत नाहीये किंवा तिची कार्यक्षमता कमी झाली आहे, हे जवळपास 90 टक्के जणांना माहितीच नसतं, असं संशोधकांनी केलेल्या माहितीच्या विश्लेषणानंतर लक्षात आलं. कारण त्याबद्दलची लक्षणं दिसून येत नाहीत.

फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेफ्रॉलॉजी अँड किडनी ट्रान्स्प्लांट विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजीव गुलाटी सांगतात, की किडनीची कार्यक्षमता 70 ते 80 टक्क्यांपर्यंत घटते, तरीही संबंधित व्यक्तीला त्याचा अजिबात सुगावा लागत नाही. त्यामुळे नंतर आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर इलाज करणं अवघड जातं. त्यामुळे हा सायलेंट किलर विकार ठरत आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

कोरोना संसर्गामुळे फुप्फुसाशी संबंधित अनेक समस्या तयार होतात. किडनीवर त्याचा कशा प्रकारे आणि का दुष्परिणाम होतो, हे निश्चितपणे कळण्यासाठी अजून संशोधनाची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना लाँग कोविड (Long Covid) होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे.

लाँग कोविड या प्रकारात कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीला त्यातून बरं झाल्यानंतर एका महिन्यानंतर किंवा अनेक महिन्यांपर्यंत नवनवी लक्षणं दिसत राहतात. या नव्या अभ्यासाबद्दलचा रिपोर्ट वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतले झियाद अल एली यांनी लिहिला आहे.

ज्यांना कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं किंवा ज्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं होतं, त्यांची किडनी फेल होण्याची शक्यता अधिक आहे, असं झियाद अल-एली यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना कानावर अटॅक करत असल्याची धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. कान दुखणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कान जड होणे, घंटी किंवा शिटी वाजवल्यासारख्या आवाजाचा भास होणं अशा समस्या आता रुग्णांमध्ये आढळून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनामुळे रुग्णांना नीट झोप देखील लागत नाही. डॉक्टरांच्या मते हा कोरोनाचा नवा स्ट्रेन ड़ेल्टा व्हेरिएंट असू शकतो. रुग्णांमध्ये सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस पाहायला मिळत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे हा त्रास होतो. कोरोना व्हायरस नाकाच्या माध्यमातून इम्यून सिस्टमवर अटॅक करतो. नाक आणि कान हे कनेक्टेड असतात.

जे इन्फेक्शन नाकात असतं ते पुढे कानात जातं. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनने रिएक्शन होतं. कान डॅमेज होऊ शकतो. एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुधीर भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस कान आणि डोळ्यांवर थेट अटॅक करतो. नव्या स्ट्रेनमध्ये ताप येणं, पोट दुखणं, डायरिया, गॅस, उलटी, पाठदुखी, एसिडिटी, भूक न लागणं सारखी नवनवीन लक्षणं पाहायला मिळत आहेत.

Read in English