Health care: रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यावे; अन्यथा उशिरा जेवल्याने होतात अनेक अपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 07:45 AM2024-02-27T07:45:28+5:302024-02-27T07:51:16+5:30

Food Habit: पूर्वीच्या काळी रात्री लवकर जेवायची सगळ्यांनाच सवय होती. आपले आजी आजोबा आजही रात्रीचे जेवण लवकर घेतात आणि बेताचा आहार घेतात. त्यामुळे ते निरोगी राहतात. याउलट आपण आपली दिनचर्या बिघडवल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देत आहोत. सूर्यास्तापूर्वी जेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते आणि उशीरा जेवल्याने कोणते नुकसान होते, ते डॉ. अमित भोरकर यांच्याकडून जाणून घेऊ.

अनेकांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यामध्ये बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. तज्ञांच्या मतानुसार रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या.

रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.

रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.

रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशीरा जेवणे टाळावे.

रात्री उशीरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात. अपचन झाल्यामुळे झोप नीट लागत नाही आणि रात्रभर अस्वस्थ वाटत राहते. अशा वेळी दोन घास कमी खाणे श्रेयस्कर ठरते.

रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते.

म्हणूनच सलग २१ दिवस सूर्यास्तापूर्वी जेवण्याचा सराव करा. एखादी सवय लागायला २१ दिवस पुरेसे असतात. जेवणाची ही सवय एकदा का लागली की या बदलाचे फायदे आयुष्यभर घेऊ शकता. त्यात सातत्य ठेवा. उशिरात उशिरा रात्री ८ च्या आधी हलके जेवून घ्या आणि थेट दुसऱ्या दिवशी नाश्ता करा.