डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध डोळ्यांमध्ये टाकू नये, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 04:26 PM2022-10-31T16:26:29+5:302022-10-31T16:41:38+5:30

डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य आजार आहे.

डोळे येणे असो किंवा जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे या त्रासातून सुटका होण्यासाठी अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये औषधे टाकतात. परंतु कोणत्या आजारांवर कोणते औषध घ्यावे, हे तज्ज्ञ डॉक्टरच सांगू शकतात. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध डोळ्यांमध्ये टाकू नये, असे आवाहन नेत्र तज्ज्ञांकडून केले जाते.

विविध कारणांनी डोळ्यांचा त्रास होतो. हाताने डोळे चोळू नयेत. तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डोळ्यात औषधे टाकावीत. सल्ल्याशिवाय औषधे टाकणे म्हणजे दृष्टिदोषाला निमंत्रणच आहे.

१) डोळे येणे हे जंतूंच्या प्रसारामुळे होणारी प्रक्रिया आहे. शिवाय रासायनिक पदार्थ, धूळ, प्रखर प्रकाश किरणे यामुळे डोळे येऊ शकतात. २) डोळे आल्यानंतर डोळ्यांमध्ये जळजळ होण्याचे प्रमाण वाढते. डोळे सुजून लाल होतात. डोळ्यातून पाणी येण्यासह वेदनाही होऊ शकतात.

डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे ज्याला डोळे आले असतील अशा रुग्णाने वापरलेला हातरुमाल, टॉवेलसह इतर वस्तू वापरू नयेत. शक्यतो डोळे आलेल्या रुग्णांपासून दूर अंतर ठेवून काळजी घेणे गरजेचे आहे.

डोळे येण्याच्या आजाराला वेगवेगळी कारणे असतात. आजार, रुग्णाचे वय यानुसार डोळ्यात टाकावयाचे ड्रॉप ठरवले जातात. ड्रॉपमध्ये स्टेरॉईडचा वापर केलेला असतो. त्यामुळे ड्रॉप स्वत:हून डोळ्यात टाकणे टाळावे. ड्रॉपच्या अतिप्रमाणात केलेल्या वापराचे साईड इफेक्ट होऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.