CoronaVirus Live Updates : बापरे! फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवावर अटॅक करतोय कोरोना; 'हे' आहे नवं लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:22 AM2022-04-28T11:22:39+5:302022-04-28T11:38:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकारसह आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.

देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,303 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,23,693 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकारसह आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.

कोविड-19 ची नवीन प्रकरणे सातत्याने समोर येत असली तरी, डॉक्टरांचे म्हणणे आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत, परंतु तरीही लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

ANI या वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीतील अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर निखिल मोदी यांनी गेल्या 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचं म्हटलं आहे. पण बहुतांश घटनांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.

डॉ. मोदी म्हणाले की, सध्या, कोविड 19 च्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, शिंका येणे, घसा खवखवणे आणि खोकला यासारख्या सौम्य लक्षणांचा समावेश आहे. त्यांनी सांगितलं की, अलीकडे अतिसार (डायरिया) हे कोविड लक्षण म्हणून पाहिलं जात आहे.

संसर्ग रोखण्यासाठी सूचना करताना ते म्हणाले की, लोकांनी अनिवार्यपणे मास्क घालणं आवश्यक आहे. ते म्हणाले की, ज्या वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यादृष्टीने अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे.

डॉ. मोदी म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डायरियासारख्या पोटाशी संबंधित समस्या पहिल्यांदाच दिसून येत आहेत. गेल्या 10 दिवसांत डायरियासारख्या आजाराशी संबंधित अनेक कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

ज्या लोकांना आधीच आरोग्याशी संबंधित आजार आहेत त्यांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. बालकांच्या सुरू असलेल्या लसीकरणाबाबत ते म्हणाले की, हे एक अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचे पाऊल आहे.

जर एखाद्याने लसीकरण केले नाही तर तो या व्हायरसचा प्रसार करू शकतो. लसीकरण न केलेल्या लोकांना संसर्ग झाल्यास हा व्हायरस त्यांच्या शरीरात आणखी विकसित होईल. यामुळे नवीन म्यूटेशनचा होण्याचा धोका वाढेल.

नवी दिल्लीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसर्ग रोखणे ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही कोरोनाच्या इतर लाटांप्रमाणेच चाचणी, ट्रॅक आणि उपचार या धोरणाचा अवलंब केला पाहिजे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.