ऐश्वर्यानं १२ वीत मिळवले होते ९० टक्के गुण, बॉलीवूडमध्ये यायचं नव्हतं; तिची इच्छा तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 04:55 PM2022-09-29T16:55:39+5:302022-09-29T17:04:08+5:30

बॉलीवूड सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं मुंबईत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. बारावीच्या परीक्षेत तिनं ९० टक्के गुण मिळवले होते. १९९४ मध्ये ऐश्वर्यानं मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. तिला खरंतर सिनेमात काम करायचं नव्हतं. तिचं स्वप्न वेगळंच होतं.

मिस वर्ल्ड बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. दक्षिणेकडील चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोनियन सेल्वन-१ हा नवीन चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत साऊथचा सुपरस्टार विक्रम दिसणार आहे. हा चित्रपट चोल राजवंशावर आधारित आहे, जो भारताच्या इतिहासाचा एक भाग होता. ऐश्वर्या रायनं याआधी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

ऐश्वर्या जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच ती शालेय जीवनातही गुणवान विद्यार्थिनी राहिली आहे. ऐश्वर्याला सुरुवातीला अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंगची आवड नव्हती. १९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

ऐश्वर्या रायचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ साली कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. ऐश्वर्याच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. त्यामुळे ऐश्वर्याचं संपूर्ण शिक्षण मुंबईत झालं. शालेय शिक्षण आर्य विद्या मंदिर हायस्कूलमधून झालं आहे.

ऐश्वर्यानं जय हिंद महाविद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. तिला इयत्ता बारावीत ९०% गुण मिळाले होते. ती शाळेत संगीताचे वर्गही घेत असे. ती भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. खरंतर ऐश्वर्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं. हेच तिचं स्वप्न होतं.

शाळेत चांगली विद्यार्थिनी असलेली ऐश्वर्या अभ्यासासोबतच मॉडेलिंगमध्येही भाग घेत असे. बारावीनंतर ऐश्वर्या रायनं ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला. पण मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तिनं तिचं शिक्षण मध्यंतरी सोडलं होतं.

ऐश्वर्या सांगते की तिच्या ग्रॅज्युएशन दरम्यान तिला 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाची ऑफर आली होती. ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये रोबोट, सरबजीत, जोश, जोधा अकबर आणि देवदास यांसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.

ऐश्वर्या राय आता चार वर्षानंतर कमबॅक करतेय. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटात ती नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याचे चाहते दीर्घकाळापासून या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 3 मिनिट 23 सेकंदाचा हा भव्य दिव्य ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ची आठवत येते.

सोशल मीडियावर या ट्रेलरची जबरदस्त चर्चा आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा विविध भाषेत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील प्रत्येक सीन तुम्हाला खिळवून ठेवतो. युद्धाचे प्रसंग पाहताना तर अंगावर शहारा येतो. शिवाय हमखास ‘बाहुबली’ची आठवण येते.

ट्रेलरच्या शेवटी ऐश्वर्या समोर येते आणि सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिची व्यक्तिरेखा आणि सौंदर्य पाहून तुम्हाला ‘देवदास’मधली पारो किंवा ‘जोधा अकबर’मधील जोधाची आठवल्याशिवाय राहणार नाही. 500 कोटी बजेटच्या या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये ती राजकुमारी नंदिनी आणि मंदाकिनी देवीची भूमिका साकारणार आहे.