CoronaVirus News : तुमच्या मुलांसोबत असं होतं का?, कोरोनाचा चिमुकल्यांवर वाईट परिणाम, सर्व्हेत धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:36 PM2022-03-22T17:36:24+5:302022-03-22T17:51:47+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना महामारीत शाळा बंद राहिल्याने मुलांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे.

देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,581 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 33 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

लहान मुलांना देखील कोरोनाचा फटका बसला आहे. अनेक मुलांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. पालकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लहान मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून काही काळ शाळा बंद होत्या, कोरोना महामारीत शाळा बंद राहिल्याने मुलांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. ऑनलाईन वर्ग सुरू असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम कमी होता.

एका नवीन सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की महामारीच्या काळात मुलांच्या वाचन आणि लिहिण्याच्या क्षमतेत कमालीची घट झाली आहे. नॅशनल कोलेशन ऑन एज्युकेशन इमर्जन्सी या संस्थेने हे सर्वेक्षण तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन दक्षिणेकडील राज्यांमध्ये केले होते.

सर्वेक्षणात, 70 ते 80 टक्के पालकांनी कबूल केले की त्यांच्या मुलांच्या वाचन आणि लिहिण्याच्या क्षमतेवर महामारीच्या काळात परिणाम झाला आहे. ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत 500 कुटुंबांचा समावेश करून हे सर्वेक्षण करण्यात आले.

ही सर्व कुटुंबे अल्प उत्पन्न गटातील होती. ते म्हणतात, 'मुले मुळाक्षरे विसरली आहेत आणि त्याचवेळी शिकण्याची क्षमताही कमी झाली आहे.' ही मुलं परीक्षेसाठी तयार नसल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. हे अंतर खूप मोठे आहे आणि ते भरून काढणे खूप कठीण आहे.

अभ्यासात असे म्हटले आहे की ज्या घरातील मुले शाळाबाह्य भाषा बोलतात, त्या घरातील मुले जास्त प्रभावित होतात. अशा परिस्थितीत या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना दोन ग्रेड पुढे नेले तर अडचणी येतील.

काही पालकांचे म्हणणे आहे की लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या सवयींमध्ये खूप बदल झाला आहे. मुलांमध्ये एकाग्रता कमी होणे, मोबाईलचे व्यसन, शिस्तीचा अभाव, अभ्यासात रस नसणे, टीव्ही पाहण्याची सवय, मानसिक ताण, खाण्याच्या सवयीतील बदल, एकटेपणा या समस्या दिसून येत आहेत.

आपल्या लहान मुलांनीही स्वच्छतेकडे लक्ष देणे सोडून दिल्याचे अनेक पालकांच्या निदर्शनास आले आहे. लॉकडाऊन दरम्यान कर्नाटकातील सरकारी शाळांमधील दोन तृतीयांशपेक्षा कमी विद्यार्थ्यांकडे सर्व पाठ्यपुस्तके होती.

खासगी शाळांची परिस्थिती तर आणखी वाईट होती. खासगी शाळांच्या भरमसाठ फीमुळे अनेक मुलांनी ऑनलाइन शिक्षणही सोडले. त्याचबरोबर ऑनलाइन शिक्षणाबाबत पालकांमध्ये एकमत आहे की या माध्यमातून आपली मुले काहीच शिकली नाहीत.

काही पालकांनी मात्र ऑनलाईन अभ्यासाला पाठिंबा दिला आहे. कोरोनापासून मुलांचा बचाव करण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.