मुलाचा गुन्हा, आईला शिक्षा! पळून गेलेल्या तरूणीच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेन्डच्या आईचं केलं अपहरण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 12:14 PM2021-06-04T12:14:34+5:302021-06-04T12:32:29+5:30

शेरपूर गावातील एका तरूणाचं गावातीलच एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. काही महिन्यातच त्यांचं प्रेम अधिक फुललं.

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील अस्थामा पोलीस स्टेशन भागात येणाऱ्या शेरपूर गावातून नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेबाबत समजल्यावर पोलिसच काय सगळेच हैराण झाले. तसेच लोक संतापले देखील.

शेरपूर गावातील एका तरूणाचं गावातीलच एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. काही महिन्यातच त्यांचं प्रेम अधिक फुललं. दोघांनाही एकमेकांशिवाय जगणं अवघड झालं. दोघांनी सोबत राहण्याची शपथ घेतील. पण त्यांच्या या स्वप्नात तरूणीच्या घरचे लोक आडकाठी ठरले.

तरूणीच्या घरातील लोक दोघांच्या लग्नासाठी अजिबात तयार नव्हते. त्यांचा या लग्नाला विरोध होता. अशात प्रेमी युगुलाने घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. इतकंच काय तर दोघे घर सोडून पळून गेले.

जेव्हा तरूणीच्या घरातील लोकांना दोघे पळून गेल्याचं समजलं तर ते चांगलेच संतापले होते. ते रागारागात मुलाच्या घरी गेले. तरूणीच्या कुटुंबीयांनी तरूणाच्या आईला जबरदस्ती घरातून उचलून नेलं आणि बंदी बनवलं.

त्यांनी तरूणाच्या आईला साधारण ९ तास बंधक बनवून ठेवलं होतं. यादरम्यान तरूणाच्या आईला नको नको तो त्रास देण्यात आला. तरूणीच्या घरचे लोक या गोष्टीवर अडून बसले होते की, जोपर्यंत तरूण तरूणीला परत आणून देत नाही तोपर्यंत ते त्याच्या आईला सोडणार नाहीत.

हे प्रकरण आणखीनच चिघळत गेलं. एकाच गावातील घटना असल्याने गावातील लोकही कुणा एकाची बाजू घेण्यासाठी समोर आले नाहीत.

यादरम्यान कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तरूणीच्या कुटुंबीयांनी केलेला कारनामा समजताच पोलिसांची एक टीम त्यांच्या घरी पोहोचली आणि महिलेची सोडवणूक केली गेली. दुसरीकडे तरूण आणि तरूणीचा काहीच पत्ता लागला नाही.

प्रेमी युगुल फरार झाल्यावर आणि तरूणाच्या आईचं अपहरण केल्यानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्यानंतर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अशात नालंदाचे डीएसपी डॉक्टर शिब्ली नोमानी म्हणाले की, पोलीस घटनेची चौकशी करत आहे. जे कुणी यात दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.