एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:04 IST2026-01-05T17:58:56+5:302026-01-05T19:04:56+5:30
Nikitha godishala Arjun Sharma: २६ वर्षीय बॉयफ्रेंडने पोलिसांना कॉल करून निकिती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा २७ वर्षीय निकिताचा एक्स बॉयफ्रेंडच्या घरातच मृतदेह मिळाला. तिच्यासोबत नक्की काय घडलं?

Nikitha Rao Godishala News: २६ वर्षाच्या अर्जून शर्मा याने ९११ नंबर कॉल करून पोलिसांना सांगितले की, त्याची एक्स गर्लफ्रेंड निकिता राव गोदिशाला बेपत्ता आहे. माझ्या घरीच मी तिला शेवटचे भेटलो होतो. पोलिसांत तक्रार करून अर्जून डल्लस विमानतळावर गेला आणि अमेरिकेतून भारतात येण्यासाठी विमानात बसला.

पोलिसांनी शोध घेतला तेव्हा निकिता गोदिशालाचा मृतदेह अर्जून शर्माच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मिळाला. निकिता ३१ डिसेंबर २०२५ रोजीपासून बेपत्ता होती. अमेरिकन पोलिसांनी सांगितले की, अर्जून शर्मानेच तिची चाकूने हत्या केली आणि कॉल केला. त्यानंतर तो फरार झाला.

मेरीलँडमधील कोलंबियाजवळ असलेल्या ट्विन रिव्हर्स रोड परिसरातील ब्लॉक १०१०० मधील अपार्टमेंटमध्ये निकिताची हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले होते. ३१ डिसेंबर घटना घडली, पण अर्जूनने २ जानेवारी रोजी तक्रार दिली. पोलिसांनी सांगितले की, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ नंतर तिची हत्या केली गेली.

हॉवर्ड काऊंटी पोलिसांनी सांगितले की हत्या करून पळून जाण्याचा कट पूर्वनियोजित असल्याचे दिसत आहे. हत्येसाठी वापरलेले शस्त्र अद्याप मिळालेले नाही. निकिता आणि अर्जून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे ब्रेकअप झाले. पण, ते एकमेकांशी सातत्याने बोलत होते. अजून हत्या नेमकी कोणत्या मुद्द्यावरून केली, हे स्पष्ट झालेले नाही. त्याचाही तपास सुरू असल्याचे पोलीस विभागाचे प्रवक्ते सेट हॉफमन यांनी सांगितले. अर्जूनला इंटरपोलने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तामिळनाडूमध्ये अटक केली.

२७ वर्षीय निकिता गोदिशाला ही डेटा आणि स्ट्रॅटजी विश्लेषक म्हणून काम करत होती. मेरीलँडमधील कोलंबियात असलेल्या Vheda Health मध्ये ती नोकरी करत होती. फेब्रुवारी २०२५ मध्ये तिने हा जॉब सुरू केला होता. चांगले काम केल्याबद्दल तिला ऑल इन अवॉर्डही मिळाला होता.

त्यापूर्वी निकिता राव गोदिशाला मेरीलँड विद्यापीठाच्या मॅनेजमेंट सायन्सेस फॉर हेल्थमध्ये डेटा अॅनालिस्ट आणि व्हिज्युलायझेशन स्पेशालिस्ट म्हणून काम करत होती. अमेरिकेत जाण्यापूर्वी निकिताने भारतातही काम केले होते. तिने आधी क्लिनिकल फार्मासिस्ट, तर नंतर क्लिनिकल डेटा स्पेशालिस्ट म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये काम केले होते.

निकिताने जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजी विद्यापीठातून फार्मसी शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर मेरीलँड विद्यापीठात हेल्थ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले होते. ती इंग्रजी, हिंदी, तेलगू या तिन्ही भाषा अस्खलित बोलायची.

















