Zomato IPO: ९,३७५ कोटींच्या आयपीओची प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात येणार आयपीओ; गुंतवणूकीची मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 01:10 PM2021-07-08T13:10:13+5:302021-07-08T13:17:35+5:30

Zomato IPO Listing : ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार झोमॅटोच्या आयपीओच्या प्रतीक्षेत होते. पुढील आठवड्यात येणार झोमॅटोचा आयपीओ.

Zomato IPO: व्यापारी आणि गुंतवणूकदार मोठ्या काळापासून झोमॅटोच्या आयपीओची वाट पाहत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. कारण येत्या आठवड्यात १४ जुलैला कंपनीचा आयपीओ येणार आहे.

ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमाटोने प्रति शेअर ७२ ते ७६ रुपये किमतीच्या इश्यूद्वारे ९३७५ कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली आहे.

या इश्यू ऑफरमध्ये फ्रेश इक्विटी शेअर्स आणि नोकरी डॉट कॉमची पेरेंट कंपनी इन्फो एजद्वारे ऑफर फॉर सेल (ओएफएस) समाविष्ट आहे.

कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये अँट फायनॅन्शिअल, इंन्फो एज, Sequoia आणि उबेर यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीचा आणखी कोणताही प्रमोटर नाही.

कंपनीच्या मेगा आयपीओमध्ये ७५ टक्के हिस्सा क्वालिफाईड इंन्स्टीट्यूशनल बायर्स आणि १५ टक्के हिस्सा हा नॉन इन्स्टीट्यूशनल बायर्ससाठी आरक्षित आहे.

कंपनीच्या आयपीओमध्ये ६५ लाख इक्विटी शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीही आरक्षित ठेवण्यात आले आहेत. झोमॅटोच्या आयपीओसाठई गुंतवणूकदार ७२ ते ७६ रूपये प्रति इक्विटी शेअर प्राईस बँडमध्ये बिड करू शकता.

शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपये इतकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कमीतकमी १९५ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. झोमॅटोच्या आयपीओद्वारे फंड जमवण्यास सेबीकडून गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली होती.

कंपनीद्वारे फाईल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रोस्पेक्टसनुसार आयपीओच्या माध्यमातून जो फंड गोळा केला जाईल त्यामध्ये ६७५० कोटी रूपयांतून कंपनीच्या ऑर्गेनिक आणि इन ऑर्गेनिक ग्रोथ इनिशिएटिव्हचं फंडिंग केलं जाईल. तर दुसरीकडे उर्वरित रक्कम कॉर्पोरेट गरजांच्या पूर्ततेसाठी वापरली जाईल.

आर्थिक वर्ष २०२० मध्ये झोमॅटोला २,७४२ रूपयांचं उत्पन्न मिळालं होतं. तर महासाथीदरम्ंयान कंपनीला १,३६७ कोटी रूपयांचं उत्पन्न मिळालं.

सध्याही कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फंड रेझिंगनंतर झोमॅटोचं व्हॅल्युएशन ५४० कोटी डॉलर्स म्हणजेच ४०.४ कोटी रूपये इतकं झालं आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीमध्ये टायगर ग्लोबल, फिडेलिटी आणि कोरा मॅनेजमेंटसह काही गुंतवणूकदारांनी झोमॅटोमध्ये २५ कोटी डॉलर्स (१८७० कोटी रूपये) गुंतवणूक केली होती.

कोणत्याही कंपनीला आपला आयपीओ आणण्यापूर्वी ही कागदपत्रे सेबीकडे जमा करून त्याची मंजुरी घेणं आवश्यक असतं. आयपीओ आणण्यासाठी Zomato नं एप्रिल महिन्यात आपल्या कंपनीला प्रायव्हेट कंपनीमधून पब्लिक कंपनीमध्ये बदलण्याचं काम केलं आहे.

यासाठी झोमॅटोनं आपल्या कंपनीचं नाव बदलून Zomato Limited वरून Zomato Private Limited असं केलं आहे. आयपीओ आणण्यापूर्वीच Zomato नं फेब्रुवारी महिन्यात टायगर ग्लोबल, कोरा आणि अन्य कडून २५ कोटी डॉलर्सचं फंडिंग जमवलं होतं. यासाठी कंपनीची मार्केट व्हॅल्यू ५.४ अब्ज डॉलर्स इतकी ठरवण्यात आली होती.

कोटक महिंद्रा लिमिटेड, मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेड सुइस सिक्युरिटिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी आयपीओचे ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स आणि लीड मॅनेजर्स असतील.

Zomato मध्ये चीनच्या Ant Group नं मोठी गुंतवणूक केली आहे. हा समुह जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाशी निगडीत आहे. यामध्ये जॅक मा यांची गुंतवणूक आहे.