भारतीयाला Tesla मध्ये मिळाली ₹1157 कोटी पगाराची नोकरी; पिचाई अन् नडेलांना टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:47 IST2025-05-21T17:41:37+5:302025-05-21T17:47:10+5:30
Who is the Vaibhav Taneja : भारतात टेस्लाचा विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

Who is Tesla CFO Vaibhav Taneja: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासारख्या भारतीयांनी जगभर देशाचे नाव उंचावले आहे. आता याच यादीत दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणारा वैभव तनेजा यांचेही नाव जोडले गेले आहे. गौरव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे, त्यांना इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीत सर्वाधिक पगार मिळाला आहे.
पगार ऐकून थक्क व्हाल-टेस्लामध्ये मुख्य वित्तीय अधिकारी पदावर काम करणाऱ्या वैभव तनेजा यांना 2024 मध्ये एकूण 139.5 मिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 1157 कोटी रुपये पगार मिळाला आहे. फक्त 4 लाख डॉलर्सचा मूळ पगार असलेल्या वैभव तनेजा यांनी एवढा मोठा पगार मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांच्या पगाराचा मोठा भाग टेस्लाच्या स्टॉक ऑप्शन्स आणि इक्विटी अवॉर्ड्समधून आला आहे.
सुंदर पिचाई अन् सत्या नडेलांपेक्षा जास्त पगार- वॉल स्ट्रीटच्या अहवालानुसार, 2024 मध्ये वैभव तनेजा यांनी पगाराच्या बाबतीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनाही मागे टाकले आहे. 2024 मध्ये सत्या नाडेला यांनी 79.1 मिलियन डॉलर्सची कमाई केली, तर सुंदर पिचाई यांना 10.73 मिलियन डॉलर्स पगार मिळाला. दरम्यान, टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे वैभवची कमाई वाढली आहे.
वैभव तनेजा कोण आहे? इलॉन मस्क यांच्या कंपनीकडून इतके मोठे पॅकेज मिळालेले वैभव तनेजा भारतीय आहे. 1999 मध्ये दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 2000 मध्ये चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवली. 2006 मध्ये ते शिक्षणासाठी अमेरिकेला गेले, तिथे त्यांनी सीपीए पदवी मिळवली. ते 2017 मध्ये टेस्लामध्ये सामील झाले. वैभव तनेजा हे टेस्लाचे सीएफओ तसेच टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. भारतात टेस्लाचा विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.