आयुष्याच्या परीक्षेत २० वेळा नापास;आज ५०० कोटीच्या कंपनीचे मालक,विकास नाहर यांचा प्रेरणादायी प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 03:25 PM2023-11-17T15:25:11+5:302023-11-17T15:33:56+5:30

Success Story: यश हे वय पाहून मिळत नाही. मेहनत करण्याची तयारी असेल आणि जिद्द असेल तर यश हे मिळतंच.

काही जण कमी वेळेत यशाचे सर्वोच्च शिखर गाठतात, तर काहींना अनेक अपयशानंतर मोठं यश मिळाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अनेकदा प्रयत्न करूनही एकापेक्षा जास्त वेळ पदरी अपयश आल्यास काही लोक निराशेच्या गर्तेत सापडतात. पण या समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या संघर्षाने समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका ध्येयवेड्या उद्योजकाच्या सक्सेस स्टोरीबद्दल सांगणार आहोत. सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित शार्क टँक इंडिया सीजल-२ मध्ये झळकणारे विकास डी. नाहर यांचा आजवरचा प्रवास कसा होता हे पाहू. विकास डी नाहर ड्राई फ्रूट्स एंड स्नैक ब्रांड हॅपिलो या कंपनीचे मालक आहेत. येत्या शार्क टँक इंडियाच्या नवीन डिजिटल-ओन्ली भागात शार्क टँक इंडिया गेटवे टू शार्क टँक इंडिया- २ चा ते भाग असणार आहेत. अलीकडेच, विकास डी नहार यांच्यासोबत शार्क टँक इंडियाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर या शोचा विशेष भाग शेअर करण्यात आला आहे.

आज ५०० कोटीच्या कंपनीचे मालक- या व्हिडीओमध्ये त्यांनी आपला उद्योजक बनण्याच्या प्रवासाबद्दल अनुभव सांगितला आहे. सातत्याने अपयश पदरी पडत असताना खंबीरपणे आव्हानांना तोंड देत त्यांनी तब्बल ५०० कोटींची कंपनी उभी केली. केवळ मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अवघ्या १० हजारांत त्यांनी २०१६ मध्ये त्यांनी हॅपिलो कंपनीची सुरूवात केली.

हॅपिलो कंपनीचा प्रेरणदायी प्रवास- सात्विक स्पेशालिटी फूड्समध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या अनुभवांच्या जोरावर हॅपिलो कंपनीची सुरूवात केली. बंगळुरू युनिवर्सिटीमधून बीसीए केल्यानंतर त्यांनी काही काळ जैन ग्रुपसोबत काम केले. या नोकरीवर पाणी सोडून त्यांनी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केले. त्या काळात विकास.डी.नाहर यांना मिळालेल्या अनुभवातून त्यांनी हॅपिलो कंपनीची स्थापन केली.

सातत्याने प्रयत्न करणे ही यशाची गुरूकिल्ली- अपयशाने हताश न होता वारंवार प्रयत्न करणं ही माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे, असं त्यांनी शार्क टँक इंडिया गेटवे टू शार्क टँक इंडिया-२ च्या भागामध्ये सांगितलं. ५०० कोटींची कंपनी उभी करण्यासाठी त्यांना अमाप संघर्ष करावा लागला. शिवाय आयुष्याच्या परीक्षेत ते २० वेळा नापास झाले. असं असतानाही त्यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ध्येय उराशी बाळगून संकटांचा सामना केला.