'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:59 IST2025-11-20T11:35:05+5:302025-11-20T11:59:22+5:30

Work Life Balance : गेल्या काही वर्षांपासून वर्क लाईफ बॅलन्स हा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. आजच्या कॉर्पोरेट जगात कामाचा ताण इतका वाढला आहे की, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याला किंवा दुःखालाही किंमत राहिलेली नाही. खासगी असो वा सरकारी, गरज असेल तर कर्मचाऱ्याला सुट्टी मिळणे अपेक्षित असते. मात्र, सध्याची 'टॉक्सिक वर्क कल्चर' किती विषारी झाली आहे, हे दर्शवणारी एक धक्कादायक रेडिट पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एका खासगी कंपनीत दोन वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आयुष्यात अचानक एक वाईट घटना घडली. त्याच्या आजोबांचे निधन झाले. त्याने ताबडतोब आपल्या मॅनेजरला व्हॉट्सॲपवर मेसेज करून सुट्टीची माहिती दिली.

कर्मचाऱ्याने लिहिले: “सर, माझे आजोबा गेले. आज सुट्टी पाहिजे, ऑफिसला येऊ शकणार नाही.” साधारणपणे, अशा परिस्थितीत कोणत्याही संवेदनशील व्यक्तीने 'दु:ख व्यक्त करत पुरेसा वेळ घेण्याची' परवानगी दिली असती. पण या मॅनेजरचे उत्तर वाचून अनेकांना धक्का बसला.

मॅनेजरचे उत्तर होते: “हे ऐकून खूप दुःख झाले. आज सुट्टी घ्या. पण आज आम्ही काही क्लायंट्सना ऑनबोर्ड करत आहोत, त्यामुळे तुम्ही इंडक्शन कॉलवर राहू शकता का? व्हॉट्सॲपवरही ॲक्टिव्ह राहा आणि गरज पडल्यास डिझायनर्सशी संपर्क करा.”

या पोस्टने कॉर्पोरेट वर्क कल्चर किती 'विषारी' झाली आहे, याकडे लोकांचे लक्ष वेधले. काही तासांतच यावर लाखो प्रतिक्रिया आणि हजारो कमेंट्स आल्या. अनेक लोकांनी त्यांचे स्वतःचे वाईट अनुभव शेअर केले.

एका मुलीने सांगितले: तिच्या वडिलांचे निधन झाल्यावर बॉसने "कंपनीमध्ये फक्त तीन दिवसांची रजा मिळते, चौथ्या दिवसापासून ऑफिसला या" असे सांगितले होते. दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले: पत्नीचा गर्भपात झाल्यावरही बॉसने त्याला दुसऱ्याच दिवशी मीटिंगसाठी बोलावले.

कंपन्या पैसे वाचवण्यासाठी नवीन कर्मचारी घेत नाहीत आणि असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा संपूर्ण बोजा टाकतात. कोणी सुट्टी मागितल्यास लगेच 'घरून काम करा' असा सल्ला दिला जातो. अनेक मॅनेजर वीकेंडला किंवा रात्री १०/११ वाजताही कर्मचाऱ्यांना नवीन काम देतात. कोणी कर्मचारी आजारी पडल्यास, 'डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊनच ऑफिसला या' असे बोलले जाते.

या प्रकारच्या टॉक्सिक वातावरणातून बाहेर पडण्यासाठी अनेकांनी 'अशा बॉसचे गुलाम होण्याऐवजी नोकरी सोडून देण्याचा' सल्ला दिला आहे. दुसरीकडे, काही चांगल्या खासगी कंपन्या मेंटल हेल्थ डेज, अमर्यादित सिक लीव्ह आणि वीकेंडला मेसेज केल्यास दंड यांसारखे नियम लागू करून कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहत आहेत.