शेअर बाजारातील घसरणीमुळे SIP नको वाटते? गुंतवणूकदारांसाठी 'या' आहेत ३ बेस्ट योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 14:34 IST2025-03-02T14:32:24+5:302025-03-02T14:34:34+5:30

investment options : शेअर मार्केटमध्ये पैसे बुडण्याची भिती वाटत असेल तर तुम्ही इतर योजनांमध्येही गुंतवणूक करू शकता. आम्ही या ठिकाणी ३ बेस्ट योजनांची माहिती देणार आहोत.

गेल्या ४ महिन्यात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांचा बाजार उठवला आहे. फक्त स्टॉक्स नाही तर एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारेही तोट्यात आहेत. पण, एक चांगला गुंतवणूकदार कधीही एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करत नाही. गुंतवणुकीतील वैविध्य हेच खरं आर्थिक व्यवस्थापन आहे. तुम्हीही एसआयपी सोडून इतर गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी बेस्ट ३ योजना घेऊन आलो आहोत.

मुदत ठेव हे कमी जोखीम आणि निश्चित परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बेस्ट योजना आहे. एफडीचे इतरही अनेक फायदे आहेत. आवश्यकता वाटेल तेव्हा तुम्ही हे पैसे काढू शकता. बँका एफडी वर कर्जाची सुविधा देखील देतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही एफडीचा कालावधी निवडू शकता. यात ७ दिवसांपासून अगदी ५ वर्षांपर्यंत मुदत ठेव योजना आहेत.

PPF ही भारतातील एक लोकप्रिय बचत योजना आहे. सध्या PPF वर ७.१% दराने व्याज दिले जात आहे. ही बचत योजना सरकारी हमीसह पूर्णपणे सुरक्षित आहे. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असून जो आणखी ५ वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. याचं मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला या योजनेत चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. PPF मध्ये गुंतवणूक करून आयकर कलम 80C अंतर्गत देखील कर सूट मिळू शकते.

आवर्ती ठेव किंवा आरडी ही बँका आणि पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेली बचत योजना आहे. यात लहान गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी नियमित अंतराने निश्चित रक्कम जमा करू शकतात. आरडी ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना मानली जाते.

जर तुम्हाला आरडी खाते उघडायचे असेल तर देशातील कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडता येते. पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या आरडीवर ६.७ टक्के वार्षिक व्याज देत आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दर महिन्याला ५००० रुपयांची आरडी केली तर ५ वर्षात तुमची एकूण गुंतवणूक ३,००,००० होईल. ६.७ टक्के व्याजदरानुसार, ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ३,५६,८३० रुपयांची निश्चित रक्कम मिळेल. यामध्ये ५६,८३० रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे.