SIP Calculator : ५००० च्या SIP नं १०-२० वर्षांत किती फंड होईल तयार? आधी जाणून घ्या, मग गुंतवणूक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 11:21 AM2023-03-16T11:21:54+5:302023-03-16T11:27:52+5:30

एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी दीर्घ मुदतीसाठी एसआयपी करा असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात.

SIP Calculator : फेब्रुवारी महिन्यात आलेल्या म्युच्युअल फंडांच्या आकडेवारीनुसार १३६८६ कोटी रुपयांची एसआयपी करण्यात आल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून, एसआयपी इन्फ्लो मध्ये प्रचंड वाढ होत आहे. एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी दीर्घ मुदतीसाठी एसआयपी करा असा सल्लाही आर्थिक तज्ज्ञ देतात.

अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की तुम्हीही दरमहा ५००० रुपयांची SIP सुरू केली, तर येत्या १०-२० वर्षांत तुमच्याकडे किती पैसे जमा होतील. या लेखात आपण हे तपशीलवार समजून घेऊया.

शेअरखानच्या अहवालात, SIP कॅल्क्युलेटर संदर्भात तपशीलवार अहवाल शेअर करण्यात आला आहे. या अहवालानुसार येत्या काही वर्षांत तुमचा फंड किती मोठा असेल हे प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून आहे. पहिला म्हणजे तुम्ही ज्या कालावधीसाठी पैसे जमा करता आणि दुसरे म्हणजे सरासरी वार्षिक परतावा.

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ५ हजार रुपयांची एसआयपी केली आणि सरासरी वार्षिक परतावा ८ टक्के असेल, तर ५ वर्षांत ३.६९ लाख रुपयांचा निधी तयार होईल. १० वर्षात ९.२० लाख, २० वर्षांत २९.६५ लाख आणि २५ वर्षात ४७.८६ लाखांचा निधी तयार होईल.

५००० रुपयांची एसआयपी फिक्स केली आणि जर परतावा १० टक्क्यांपर्यंत वाढला, तर ५ वर्षांत ३.९० लाख रुपयांचा निधी तयार होईल. १० वर्षांत हा निधी १०.३२ लाख रुपये असेल. तर २० वर्षांत ही रक्कम ३८.२८ लाख रुपये असेल, तर २५ वर्षांत ती सुमारे ७० लाख रुपये असेल.

आता जर अशा स्कीममध्ये तुम्ही ५००० रुपयांची SIP केली असेल, ज्याचा सरासरी परतावा १५ टक्के असेल, तर येत्या ५ वर्षात तुमच्याकडे एकूण ४.४८ लाख रुपये असतील. १० वर्षात १३.९३ लाख, २० वर्षात ७५.७९ लाख आणि २५ वर्षात १ कोटी ६४ लाख रुपये जमतील.

जर तुम्हाला मिळणारा परतावा २५ टक्के असेल आणि तुम्ही ५ हजारांची SIP केली असेल, तर पाच वर्षात तुमच्याकडे सुमारे ६ लाख रुपये जमतील. १० वर्षांत तुमचा निधी २६.६५ लाख रुपये असेल. २० वर्षात हा निधी ३ कोटी ४३ लाख आणि २५ वर्षात ११ कोटी ८८ लाख इतका निधी असेल.

(टीप - या लेखात केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांना सल्ला घ्यावा.)