पगार जमा होण्याच्या दिवशी सुट्टी आलीये?, पण आता टेन्शन नाही; रिझर्व्ह बँकेनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:10 PM2021-06-04T18:10:16+5:302021-06-04T18:25:30+5:30

Reserve Bank Of India NACH : सामान्यांना मिळणार दिलासा; सुट्टीच्या दिवशीही जमा होणार वेतन, रिझर्व्ह बँकेनं केले मोठे बदल

RBI Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँकेकडून यावेळी रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

रेपो रेट ४ टक्के इतका कायम ठेवण्यात आलेला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के इतका राहणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं सामान्यांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे.

अनेकदा आपलं वेतन खात्यात जमा होणार असतं आणि त्याच दिवशी बँक हॉलिडे किंवा सुट्टीचा वार येत असतो. अशावेळी आपलं वेतन येण्यास उशिर होतो किंवा ईएमआय जाण्यासही उशिर होतो. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त चार्जेसही द्यावे लागले असतील. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांची ही समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी National Automated Clearing House (NACH) च्या सुविधेमध्ये मोठे बदल केले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून याचा फायदा सर्वांना मिळण्यास सुरुवात होईल.

NACH हे एकप्रकारचं बल्क पेमेंट सिस्टम आहे. National Payment Corporation of India याचं कामकाज पाहते.

NACH चा उपयोग सरकारी विभाग आणि कंपन्या खात्यात वेतन, पेन्शन आणि लाभांश आणि सब्सिडीसारख्या गोष्टींचं भरणा करण्यासाठी केला जातो. तर दुसरीकडे लोकांच्या खात्यातून ईएमआय, इन्शुरन्स प्रिमिअम, म्युच्युअल फंडाची रक्कम, वीज, पाणी, फोन, गॅस यांचा ऑटो बिल भरणाही याच माध्यमातून केला जातो.

परंतु NACH ची सुविधा सद्यस्थितीत बँक हॉलिडेच्या दिवशी मिळत नाही. अशा परिस्थितीत तुमचं वेतन येणाऱ्या दिवशी शनिवार-रविवार किंवा कोणत्या सणाचा दिवस आला तर तुमच्या खात्यात वेतन जमा होण्यास उशीर होतो.

यामुळे तुमच्या लोनचा ईएमआय किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा भरणा विलंबानं होऊ शको. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त चार्जेस लागण्याची शक्यता असते. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं यावर एक तोडगा काढला आहे.

लोकांना होणारी अडचण पाहता रिझर्व्ह बँकेनं आता NACH ही सेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. ही सुविधा १ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

RTGS सुविधा आठवड्याचे सातही दिवस सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा घेत NACH देखील संपूर्ण वर्षभर सुरू ठेवण्यात येणार आहे. ग्राहकांची अडचण दूर करण्यासाठी त्यांच्या हितार्थ घेतलेला हा निर्णय असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं. या बदलांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात योग्य ती रक्कम शिल्लक ठेवावी लागले.

रिझर्व्ह बँकेनं आज पतधोरण जाहीर केलं. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) ऋण ७.३ टक्के इतकं राहणार असल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली. पण मान्सूनच्या आगमनामुळे देशाच्या आर्थिक उत्पन्नात येत्या काळात वाढ होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

देशाची आर्थिक प्रगती पुन्हा रुळावर आणण्यासाठी पॉलिसी सपोर्टची अतिशय महत्वाची भूमिका आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार खुंटल्यानं चालू आर्थिक वर्षासाठीच्या विकासाचा अंदाजित दर देखील घटविण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात अपेक्षित विकासाचा दर ९.५ टक्के इतका राहील. याआधी आरबीआयनं हाच दर १०.५० टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला होता.

जोवर कोरोनाचं संकट जात नाही तोवर आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेऊनच आर्थिक गतीचा दृष्टीकोन ठेवावा लागेल, असं शक्तीकांत दास म्हणाले.

महागाईचं वाढतं प्रमाण लक्षात घेता रिझर्व्ह बँकेनं पतधोरणात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट आरबीआयनं जैसे थे ठेवल्यानं गृहकर्ज दारांच्या व्याजदरातही कोणताही बदल होणार नाही.