TATAची लवकरच मेगा भरती; Air Indiaसाठी ६ हजार वैमानिक घेणार, आणखी ३७० विमाने खरेदी करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 02:10 PM2023-02-18T14:10:58+5:302023-02-18T14:24:01+5:30

आताच्या घडीला टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३ हजारांहून अधिक वैमानिक कार्यरत आहेत.

Air Indiaची TATA मध्ये घरवापसी झाल्यापासून टाटा समूहाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एअर इंडियाला पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी टाटा कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. याचाच एक भाग म्हणून टाटाने एअर इंडियासाठी विमाने खरेदी करण्याचा सर्वांत मोठा करार केला आहे.

TATA समूहाची एअर इंडियाने फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून २५० विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये ४० वाइड बॉडी ए-३५० विमाने आणि २१० नॅरो बॉडी विमानांचा समावेश आहे. ऑर्डर वाढवण्याचा पर्यायही करारात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

टाटा समूह एकूण ४७० विमाने खरेदी करणार आहे. हा करार ८० अब्ज डॉलर्स म्हणजेच ६.४० लाख कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. टाटा समूहाची कंपनी एअर इंडियामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.

कंपनीने अलीकडेच एअरबस आणि बोईंग यांना एकूण ४७० विमानांच्या खरेदीचे करार केले असून, ताफ्यात भर पडणाऱ्या नवीन विमानांची ही संख्या पाहता कंपनीला ६ हजार ५०० हून अधिक वैमानिकांची नियुक्ती करावी लागणार आहे.

वैमानिकांव्यतिरिक्त विमानातील कर्मचारीवृंद आणि परिरक्षण दलातील कर्मचाऱ्यांची संख्या ही वैमानिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. एअर इंडियाच्या एअरबस आणि बोईंगशी झालेल्या करारांन्वये ४७० विमानांची खरेदी केली जाणार आहे.

याशिवाय या करारामध्ये आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्यायही ठेवला गेला आहे. त्यामुळे एकूण ८४० विमानांच्या खरेदीचे एअर इंडियाचे नियोजन आहे, जे जगातील कोणत्याही विमानसेवेकडून आजवरची सर्वात मोठी विमान खरेदी ठरेल. एअर इंडियाने अधिक विमाने खरेदी करण्याचा पर्यायही वापरला तर कंपनीत नव्याने दाखल होणाऱ्या वैमानिक आणि कर्मचारीवृंदाची संख्या आणखी मोठी असेल.

त्या स्थितीत एअर इंडियाला आणखी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम चालवावी लागेल, असे मानले जाते. एअरबसकडून खरीदल्या जाणाऱ्या बहुतेक विमानांचा वापर जाईल. त्यामुळे कमांडर आणि फर्स्ट ऑफिसर्ससह या प्रत्येक विमानासाठी २६ ते ३० वैमानिकांची आवश्यकता असेल.

त्यामुळे सध्या सेवेत असलेल्या वैमानिक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत नव्याने दाखल होणाऱ्या वैमानिक व अन्य प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास तिपटीने वाढू शकेल, असेही म्हटले जात आहे.

एअर इंडियाचे माजी वाणिज्य संचालक पंकज श्रीवास्तव यांच्या मते, एअर इंडिया एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने खरेदी करत असताना, त्यांनी आवश्यक वैमानिक आणि कर्मचारीवृंदाच्या भरतीची योजनादेखील तपशिलाने आखलेली असावी. उल्लेखनीय म्हणजे एअर इंडियाने विमानांच्या खरेदी कराराच्या घोषणेआधी वर्षारंभी वैमानिक प्रशिक्षण प्रबोधिनी स्थापन करण्याची घोषणाही केली होती.

एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या ११३ विमाने आहेत आणि सुमारे १६०० वैमानिक सेवेत आहेत. एअर इंडियाच्या दोन उपकंपन्या, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरएशिया इंडियाकडे एकूण ५४ विमाने आहेत, ज्यांच्या उड्डाणासाठी त्या कंपन्यांच्या सेवेत जवळपास ८५० वैमानिक आहेत.

याशिवाय टाटा समूहाच्या संयुक्त भागीदारीत सुरू असलेल्या विस्ताराच्या ताफ्यातील ५३ विमानांसाठी आणखी ६०० वैमानिक आहेत. अशाप्रकारे, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३,००० हून अधिक वैमानिक कार्यरत आहेत.