फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 03:05 PM2024-04-29T15:05:58+5:302024-04-29T15:06:52+5:30

अभिजीत पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे.

pandharpur ncp sp leader Abhijeet Patil reaction after meeting with devendra Fadnavis | फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

Abhijeet Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नेत्यांची होणारी पक्षांतरे चर्चेचा विषय ठरली आहेत. अशातच पंढरपूरमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांच्याही भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे. कारण पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन राज्य सहकारी बँकेकडून सील करण्यात आले असून यातून मार्ग काढण्यासाठी अभिजीत पाटील यांनी रविवारी रात्री भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे. कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जाऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांकडून अभिजीत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील यांनी म्हटलं की, "आजच्या भेटीत माझ्या भाजप प्रवेशाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. कारखान्याला सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि गोडाऊनचे सील काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मदतीच्या बदल्यात त्यांचीही आमच्याकडे काहीतरी अपेक्षा असेल आणि ते जर आम्हाला मदत करणार असतील तर आमच्याकडूनही त्यांनी मदतीची अपेक्षा करणे, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे शेतकरी सभांसदांसाठी जे आवश्यक आहे ते करण्याची आमची तयारी असल्याचं मी त्यांना सांगितलं आहे," असं सूचक वक्तव्य अभिजीत पाटलांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची कल्पना मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती, असा दावाही अभिजीत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काही महिन्यांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच पाटील यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातही चांगला जनसंपर्क आहे. असा तरुण नेता भाजपमध्ये गेल्यास हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे.
 
 

Web Title: pandharpur ncp sp leader Abhijeet Patil reaction after meeting with devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.