घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:16 IST2025-10-09T08:53:52+5:302025-10-09T09:16:57+5:30
Post Office Investment Scheme: जेव्हा आपण जोखीम नसलेल्या गुंतवणुकीबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम बँका आणि पोस्ट ऑफिसच्या विविध योजना येतात. पोस्टाच्या योजना तुम्हाला निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत मिळवून देतात.

Post Office Investment Scheme: जेव्हा आपण जोखीम नसलेल्या गुंतवणुकीबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम बँका आणि पोस्ट ऑफिसच्या विविध योजना येतात. रिकरिंग डिपॉझिट (RD) आणि फिक्स्ड डिपॉझिट (FD) व्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसमध्ये अशा काही योजना आहेत ज्या तुम्हाला नियमित उत्पन्नाचा स्रोत देऊ शकतात. आज आपण अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत - ती म्हणजे पोस्ट ऑफिस एमआयएस (MIS) म्हणजेच मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme).
जे लोक दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळवू इच्छितात आणि आपल्या गुंतवणुकीवर कोणताही धोका घेऊ इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे. यामध्ये तुम्ही एक निश्चित रक्कम जमा करता आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजातून तुमची कमाई होते. सध्या, या योजनेवर ७.४% दरानं व्याज मिळत आहे. पण, प्रत्येक योजनेप्रमाणे यालाही काही नियम आणि अटी आहेत. जर तुम्ही त्या समजून घेतल्या नाहीत, तर नकळत तुम्ही तुमचं मोठं नुकसान करून बसाल.
या योजनेत तुम्हाला एकरकमी रक्कम ५ वर्षांसाठी जमा करावी लागते. दर महिन्याला व्याज तुमच्या खात्यात जमा होते, ज्यामुळे तुमची कमाई होते. ५ वर्षे पूर्ण झाल्यावर, तुमची मूळ रक्कम तुम्हाला परत मिळते. अशा प्रकारे, तुमची रक्कम सुरक्षित राहते आणि तुम्ही त्यावर कमाई देखील करता.
पीओएमआयएस (POMIS) मध्ये सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंट उघडण्याचा पर्याय मिळतो. या दोन्ही खात्यांची डिपॉझिट मर्यादा वेगवेगळी आहे. सिंगल अकाउंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करू शकता, पण जॉईंट अकाउंटमध्ये ही मर्यादा वाढून १५ लाख रुपये होते. जर तुम्ही जॉईंट अकाउंटमध्ये ₹१५,००,००० जमा केले, तर ७.४% व्याजानुसार तुम्हाला दरमहा ₹९,२५० मिळू शकतात.
जॉईंट अकाउंटमध्ये जर तुम्ही ₹१५,००,००० ची गुंतवणूक केली, तर त्यावर ७.४% वार्षिक व्याज मिळेल. अशा प्रकारे, दर महिन्याची कमाई (१५,००,००० x ७.४ / १०० / १२) = ₹९,२५० इतकी होईल. वार्षिक कमाई ₹९,२५० x १२ = ₹१,११,००० होईल. आणि ५ वर्षांत एकूण कमाई ₹१,११,००० x ५ = ₹५,५५,००० होईल.
जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे पैशांची गरज भासली आणि तुम्ही ५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी रक्कम काढू इच्छित असाल, तर तुम्ही तसं करू शकता, पण एका अटीसह. अट अशी आहे की तुम्ही १ वर्षापूर्वी पैसे काढू शकत नाही. १ वर्षानंतर ही सुविधा मिळेल, पण प्री-मॅच्युअर विड्रॉल पेनल्टी (मुदतपूर्व पैसे काढण्याचा दंड) लागेल. यात १ ते ३ वर्षांदरम्यान रक्कम काढल्यास रकमेवर २% दंड लागेल. तर ३ ते ५ वर्षांदरम्यान या रकमेवर १% दंड लागेल.
उदाहरणार्थ, समजा तुम्ही ₹१५,००,००० गुंतवले आहेत आणि २ वर्षानंतर पैसे काढू इच्छिता, तर २% दंड लागेल. ₹१५,००,००० चे २ टक्के म्हणजे ₹३०,००० होतील आणि अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण ₹३०,००० चं नुकसान सोसावं लागेल. जर तुम्ही ३ वर्षानंतर आणि ५ वर्षांपूर्वी रक्कम काढली, तर १% दंडाप्रमाणे ₹१५,००० चं नुकसान होईल.
परंतु, हे कॅल्क्युलेशन ₹१५,००,००० च्या ठेवीवर आधारित आहे. जर तुम्ही यापेक्षा कमी गुंतवणूक केली, तर त्याचं २% आणि १% अमाउंट देखील त्यानुसार कमी होईल. म्हणून, जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवत असाल, तर शक्यतो ते पूर्ण ५ वर्षांपर्यंत न काढण्याचा प्रयत्न करा. ५ वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण रक्कम परत मिळेल.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खातं उघडणं खूप सोपं आहे. कोणताही भारतीय नागरिक यामध्ये खातं उघडू शकतो. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर देखील अकाउंट उघडू शकता. जर मुलाचं वय १० वर्षांपेक्षा कमी असेल, तर पालक अकाउंट चालवतील. खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट असणं आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य आहेत.