Zomato लवकरच सुरू करणार नवी सेवा; केवळ १० मिनिटांत होणार फूड डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 04:22 PM2022-03-22T16:22:29+5:302022-03-22T16:33:20+5:30

Zomato Food Delivery in 10 Minutes : कंपनीनं एक नवी सेवा सुरू केली असून याअंतर्गत केवळ १० मिनिटांमध्ये कंपनी फूड डिलिव्हरी करणार आहे.

Zomato Food Delivery in 10 Minutes : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनं (Zomato) केवळ १० मिनिटांमध्ये डिलिव्हरी देण्याची सुविधा सुरू केली आहे. कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल (Deepinder Goyal) यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, कंपनी यासाठी कोणत्याही आपल्या डिलिव्हरी भागीदारांवर कोणताही दबाव टाकणार नसल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं. आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून ही सेवा पुरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

"आज ग्राहकांना त्यांच्या गरजांची जलद उत्तरं हवी आहेत. त्यांना ना योजना करायची आहे ना वाट पाहायची आहे. खरं तर, कमी वेळात फूड डिलिव्हरी करणाऱ्या रेस्तराँचा शोध घेणं हे झोमॅटो अॅपवरील सर्वाधिक वापराचं फीचर आहे," असं ते म्हणाले.

मला असं वाटू लागलंय की झोमॅटोचा फूड डिलिव्हरीचा ३० मिनिटांचा सरासरी वेळ हा अतिशय संथ आहे आणि लवकरच तो बदलला जाईल. जर आम्ही हे केलं नाही, तर आणखी कोणीतरी हे काम करेल. इनोव्हेशन करत राहणं आणि पुढे जाणं हेच टेक इंडस्ट्रीत टिकून राहण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच आम्ही कंपनीच्या १० मिनिटांत फूड डिलिव्हरी ऑफरला Zomato Instant असं नाव दिल्याचं गोयल यांनी सांगितलं.

अधिक मागणी असलेल्या ग्राहकांच्या जवळच अशा फिनिशिंग स्टेशन्सच्या नेटवर्कवर डिलिव्हरी अवलंबून असते. डिश लेव्हल डिमांड प्रोडक्शन अल्गोरिदम आणि इन स्टेशन रोबोटिक्सवरदेखील कंपनी अधिक अवलंबून असेल. डिलिव्हरी पार्टनरद्वारे निवडल्यानंतर अन्न ताजं आणि गरम असल्याची खात्री करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हायपरलोकल स्तरावर प्रोडक्शनमुळे किंमत खुपच कमी होईल याची आम्हाला आम्हाला खात्री आहे. तर आमच्या रेस्तराँ भागीदारांसोबतच आमच्या वितरण भागीदारांसाठीही पूर्णरित्या मार्जिन आणि उत्पन्न समान राहणार असल्याचं गोयल यांनी सांगिलं. १ एप्रिल पासून गुरूग्राममधील चार ठिकाणांपासून ही सेवा सुरू केली जाईल.

ज्यावेळी कंपनी आक्रमकरित्या फूड टेक आणि रोबोटिक्स स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करत आहे, अशा वेळी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झोमॅटोनं रोबोटिक्स कंपनी मुकुंद फुड्समध्ये ५ दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणूकीची घोषणा केली होती. ही कंपनी स्मार्ट रोबोटिक उपकरणांची रचना आणि निर्मिती करते.

यापूर्वी कंपनीनं अॅड टेक फर्म Adonmo आणि B2B सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म UrbanPiper Technology मध्ये गुंतवणूक केली होती. कंपनीनं स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी १ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची योजना आखली आहे. तसंच गेल्या आठवड्यात कंपनीनं Blinkit ला वाचवण्यासाठी १५० दशलक्ष डॉलर्सचं कर्ज दिलं होतं.