Mukesh Ambani: मुकेश अंबानींची 'सॅटेलाइट ब्रॉडबँड' मार्केटमध्ये एंट्री; टाटा-मस्क-बेझोस यांना देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:36 PM2022-02-14T12:36:41+5:302022-02-14T12:42:45+5:30

मुकेश अंबानी यांनी 'सॅटेलाइट ब्रॉडबँड' मार्केटमध्ये उडी घेतली असून, कंपनीने यासाठी लक्झेंबर्गस्थित कंपनी एसईएससोबत करार केला आहे.

आशियातील सर्वात मोठे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आता 'सॅटेलाइट ब्रॉडबँड' मार्केटमध्ये उडी घेतली आहे. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी लक्झेंबर्गस्थित कंपनी एसईएस(SES)सोबत करार केला आहे.

या दोन कंपन्यांच्या जॉइंट व्हेंचरला Jio Space Technology Ltd असे नाव देण्यात आले असून, यामध्ये Jio Platforms Limited ची 1 टक्के भागीदारी असेल.

ही कंपनी सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतात पुढील पिढीची ब्रॉडबँड सेवा पुरवणार आहे. सॅटेलाइट ब्रॉडबँडमध्ये रिलायन्सची स्पर्धा भारती समूहाने गुंतवणूक केलेल्या वनवेब, एलोन मस्कच्या स्टारलिंक, अॅमेझॉनच्या प्रोजेक्ट कुपर आणि टाटा टेलिसॅटशी असेल.

Jio Platforms ने एका निवेदनात म्हटले की, नवीन संयुक्त उपक्रम देशभरात उपग्रह-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वस्त ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल.

Jio Platforms आणि SES या संयुक्त उपक्रमात अनुक्रमे 51% आणि 49% इक्विटी स्टेक ठेवतील. संयुक्त उपक्रम मल्टी-ऑर्बिट स्पेस नेटवर्कचा वापर करेल.

या नेटवर्कमध्ये जिओस्टेशनरी (GEO) आणि मीडियम अर्थ ऑर्बिट (MEO) उपग्रहांचा वापर केला जाईल. नेटवर्कची मल्टि-गीगाबिट लिंक भारतासह शेजारील देशांतील एंटरप्राइझ, मोबाइल आणि किरकोळ ग्राहकांना जोडण्यास सक्षम असेल.

SES 100 Gbps क्षमता प्रदान करेल, जिओ त्याच्या मजबूत विक्री नेटवर्कद्वारे हे विकेल. गुंतवणुकीच्या योजनेचा एक भाग म्हणून, संयुक्त उपक्रम भारतात सर्वसमावेशक गेटवे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करेल.

या करारांतर्गत, जिओ पुढील काही वर्षांत सुमारे $100 दशलक्ष किमतीचे गेटवे आणि उपकरणे खरेदी करेल. संयुक्त उपक्रमात, SES आपले आधुनिक उपग्रह प्रदान करेल आणि जिओ गेटवे पायाभूत सुविधांचे संचालन आणि व्यवस्थापन करेल.