Sankarsh Chanda Success Story: वय वर्षे फक्त २३! शेअर मार्केट ट्रेडिंगने बनला १०० कोटींचा मालक; तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:21 AM2022-06-06T11:21:44+5:302022-06-06T11:39:27+5:30

Sankarsh Chanda Success Story: या तरुणाने फक्त २ हजार रुपयांसह शेअर मार्केटमधील गुंतवणुकीला सुरुवात केली अन् अवघ्या ६ वर्षांत १०० कोटी कमावले.

शेअर मार्केटची गुंतवणूक अतिशय रिस्की मानली जाते. शेअर मार्केट अनिश्चित असल्यामुळे त्याचा ठाम अंदाज कोणीच बांधू शकत नाही. भारतात कोट्यवधी लोक आपापल्या ऐपतीनुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. (Sankarsh Chanda Success Story)

भारतातील शेअर मार्केट ट्रेडिंगचे नाव घेतली की, राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी यांसारख्या बिगबूल बिरुदावली मिरवत असलेल्या दिग्गजांची नावे डोळ्यासमोर येतात. मात्र, एका तरुणाने केवळ २३ व्या वर्षी शेअर मार्केटमधून तब्बल १०० कोटी कमावण्याची किमया साध्य केली आहे.

हैदराबाद येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव संकर्ष चंदा आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून संकर्ष याने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आता वयाच्या २३ व्या वर्षी संकर्ष १०० कोटींचा मालक बनला आहे.

संकर्ष केवळ स्टॉक मार्केटमध्येच गुंतवणूक करत नाही, तर तो Savart अर्थात Svobodha Infinity Investment Advisors Private Limited नावाच्या फिनटेक स्टार्टअपचा संस्थापकही आहे. त्याचे स्टार्टअप लोकांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते.

सन २०१७ मध्ये संकर्ष याने आपले महाविद्यालयीन शिक्षण सोडले आणि ८ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून ३५ लोकांसह संकर्षने आपली कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे शेअर बाजारातील आवडीमुळे त्यांनी आपले शिक्षण मधेच सोडले.

संकर्षने हैदराबादमधील शाळेतून १२वी पूर्ण केल्यानंतर सन २०१६ मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने फक्त २ हजार रुपयांपासून गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि पुढच्या २ वर्षांत अमाप पैसे कमावले.

संकर्षने अवघ्या २ वर्षांत जवळपास १.५ लाख रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि दोन वर्षात ते पैसे १३ लाख रुपये झाले. कंपनी सुरू करण्यासाठी ८ लाख शेअर्स विकून कंपनी सुरू केली, अशी माहिती त्याने एका मुलाखतीत बोलताना दिली होती.

संकर्ष वयाने तरुण असेल, पण त्याचे काम अनुभवी गुंतवणूकदारासारखे आहे. सन २०१६ मध्ये संकर्षने आर्थिक निर्वाण नावाचे पुस्तकही लिहिले. हे पुस्तक ट्रेडिंग आणि गुंतवणूक यातील फरक स्पष्ट करते.

संकर्ष भलेही करोडपती झाला असेल, पण त्याचे राहणीमान अतिशय साधे असून, तो सामान्यपणे जीवन जगतो. तो बहुतेक टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये असतो. जेव्हा त्याला मीटिंग किंवा शोमध्ये जावे लागते तेव्हाच तो खास कपडे घालतो, असे सांगितले जाते.