फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:36 AM2020-05-04T11:36:35+5:302020-05-04T11:51:06+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वीच फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्मवर एक मोठा करार केला होता. आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने त्याच्याही पुढे जात आणखी एक नवा करार जाहीर केला आहे.

जिओ प्लॅटफॉर्म आणि अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेक यांच्यात करार झाला आहे. अमेरिकेच्या सिल्व्हर लेकनं 5,656 कोटी रुपयांमध्ये जिओची एक टक्का भागीदारी मिळवली आहे.

या कराराबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा व मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानींनी आनंद व्यक्त केला आहे.

'सिल्व्हर लेक फर्म तंत्रज्ञानात जगभर नावाजलेली कंपनी असून, तिच्याकडे बड्या तंत्रज्ञान कंपन्यांसह भागीदारीचा मोठा विक्रम आहे.

तंत्रज्ञान आणि वित्त या बाबतीत सिल्व्हर लेक कंपनी बरीच लोकप्रिय आहे, असंही अंबानी म्हणाले आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीत सिल्व्हर लेक जागतिक क्रमांकावरील मोठी कंपनी आहे.

तसेच जगातील सुमारे 43 अब्ज डॉलर्सची संपत्ती सिल्व्हर लेक फर्मकडे असून, त्यांच्याकडे जवळपास १०० गुंतवणूकदार व कार्यकारी व्यावसायिकांची टीम आहे.

याआधी सिल्व्हर लेकने अलिबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल, दीदी चकिंग, हायला मोबाइल, अँट फायनान्शियल, एल्फाबेट व्हेरिली आणि ट्विटरमध्येही गुंतवणूक केली आहे.

22 एप्रिलला जिओ प्लॅटफॉर्मने फेसबुकबरोबर 43,574 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती, त्यानंतर जिओ प्लॅटफॉर्मची 9.9% भागीदारी फेसबुकवर गेली होती. जिओ प्लॅटफॉर्मचा फेसबुक सर्वात मोठा भागधारक आहे.

रिलायन्सचे सर्व डिजिटल व्यवसाय असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडही जिओ प्लॅटफॉर्मची एक कंपनी आहे.

तसेच माय जियो, जिओ टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन, अशा सुविधा आहेत. एवढेच नव्हे तर रिलायन्स कंपनीअंतर्गत आपले शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी डिजिटल सेवा देखील सांभाळते.