रिटायरमेंटचं टेन्शन सोडा! १ कोटींचा फंड तयार करण्यासाठी किती करावी लागेल SIP? सोपं गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:58 IST2026-01-12T17:36:00+5:302026-01-12T17:58:28+5:30
Retirement Fund : एसआयपीमधील यशाचे सर्वात मोठे गमक म्हणजे चक्रवाढ व्याज. यात केवळ तुमच्या मुद्दलावरच नाही, तर मिळालेल्या परताव्यावरही व्याज मिळते. यामुळे दीर्घकाळात तुमची छोटी गुंतवणूक एका मोठ्या निधीत रूपांतरित होते.

१ कोटींचे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही किती लवकर गुंतवणूक सुरू करता, हे महत्त्वाचे आहे. वयाच्या २५ व्या वर्षी सुरू केलेली गुंतवणूक वयाच्या ४० व्या वर्षी सुरू केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कित्येक पटीने जास्त परतावा देऊ शकते.

जर तुम्ही १२% वार्षिक परतावा गृहीत धरला, तर दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी तुम्हाला २१ वर्षात करोडपती बनवू शकते. जर तुम्ही ही रक्कम २०,००० रुपये केली, तर हा टप्पा तुम्ही केवळ १६ वर्षात गाठू शकता.

शेअर बाजारातील चढ-उतारांना न घाबरता एसआयपी सुरू ठेवणे गरजेचे आहे. बाजारात घसरण असताना तुम्हाला अधिक युनिट्स मिळतात, ज्याचा फायदा बाजार वधारल्यावर 'रुपी कॉस्ट एव्हरेजिंग'च्या माध्यमातून मिळतो.

तुमचे उत्पन्न दरवर्षी वाढते, त्याप्रमाणे तुमची एसआयपी रक्कमही दरवर्षी ५% ते १०% ने वाढवावी. यामुळे तुम्ही ठराविक मुदतीआधीच १ कोटींचे ध्येय गाठू शकता आणि महागाईवर मात करणे सोपे जाते.

इक्विटी म्युच्युअल फंडातून दीर्घकाळात सरासरी १२% ते १५% परतावा मिळण्याची शक्यता असते. पण, हा परतावा बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असल्याने गुंतवणुकीत जोखीम असते, हे लक्षात घेऊनच पाऊल उचलावे.

केवळ गुंतवणूक न करता ती एका ध्येयाशी जोडा. निवृत्ती हे ध्येय समोर ठेवून १ कोटींचा आकडा गाठण्यासाठी किती वर्षांचा कालावधी हातात आहे, याचा विचार करून एसआयपीची रक्कम निश्चित करा.

तुमची गुंतवणूक योग्य दिशेने जात आहे की नाही, याचा दरवर्षी आढावा घ्या. गरजेनुसार तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करा आणि शक्य असल्यास नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

















