रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 08:36 IST2025-04-29T08:33:47+5:302025-04-29T08:36:50+5:30

भारतात सध्या फटाफट सामान पोहोचवण्याची स्पर्धा लागलीय. तुम्हीही केवळ १० मिनिटांत किराणा माल, खाद्यपदार्थ इतकेच नाही तर पाळीव प्राण्यांसाठीही खाद्य मागवू शकता परंतु तुम्हाला एखादं औषध हवे तर ते मागवणे कठीण होते. त्यासाठी तुम्हाला आसपासच्या मेडिकल स्टोअरवर अवलंबून राहावे लागते.

रिपील(Repill) या कंपनीनं यातच संधी सोडली. दिल्लीच्या रजत गुप्तानं अमेरिकेत दीड कोटीची नोकरी सोडून भारतात काहीतरी वेगळे करायचे म्हणून याची सुरुवात केली. हा App भारतात पहिल्यांदा ६० मिनिटांत औषधे डिलिव्हरी करण्याचा दावा करते. गरजू लोकांना योग्य वेळी औषधे मिळावीत हे त्यांचे ध्येय आहे.

भारतातील आरोग्य व्यवस्थेत बऱ्याचदा औषधे वेळेवर न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होतो. रिपील हीच कमकरता दूर करतो, फूड App प्रमाणेच यावर औषधे मागवली जातात. नेमका हा बिझनेस कसा चालतो, रजत गुप्ता कोण आहे याबाबत आपण जाणून घेऊया...

रजत गुप्ताची कहाणी दिल्लीतून सुरू होते, लहानपणापासून वडिलांना कठोर परिश्रम घेताना पाहिले त्यामुळे रजतने इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण करत परदेशात जाऊन डिग्री मिळवली. सिलिकॉन व्हॅलीत ८ वर्ष काम केले. नोकरी सोडण्यापूर्वी अमेरिकेत दीड कोटीपर्यंत सॅलरी रजतला मिळत होती.

नोकरीत मन रमत नव्हते, काहीतरी वेगळे करावे यासाठी धाडसाने २०२३ साली रजतने नोकरीचा राजीनामा देत भारतात परतला. आपण असं काही करावे ज्यातून लोकांचा फायदा होईल त्यामुळे हातातील चांगली नोकरी सोडून त्याने पहिले पाऊल टाकले. अनेकांनी त्यांच्या या निर्णयावर टीका केली.

परदेशात प्रिस्क्रिप्शनच्या प्रक्रियेला पाहून रजतने भारतातही असाच एक प्लॅटफॉर्म बनवण्याची कल्पना सुचली. भारतात औषधांची डिलिव्हरी करण्याचा APP विकसित करून त्यातून लोकांची समस्या दूर होईल असं त्याला वाटले. त्यानंतर वर्षभर मेहनत घेत १२ लोकांच्या मदतीने त्याने जानेवारी २०२५ मध्ये रिपील लॉन्च केले.

रजतच्या या स्टार्टअपला अल्पावधीतच लोकांची पसंती मिळाली. दक्षिण दिल्लीत हा APP लॉन्च होताच ४०० हून अधिक ऑर्डर्स त्याच्याकडे आल्या. या डिलिव्हरीसाठी सरासरी ३०-४० मिनिटे लागतात. ३ महिन्यात बऱ्याच लोकांनी हा APP डाऊनलोड केला आहे. पुढील काळात नोएडा, गुडगाव, बंगळुरू, मुंबई येथेही अशी योजना सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.

रजत गुप्ता यांचं ध्येय केवळ औषधांची लवकर डिलिव्हरी करणे नाही तर त्यांना अशी आरोग्य यंत्रणा उभी करायची आहे जी सर्वांना एकसमान असेल. त्यांचा APP लोकांना नजीकच्या रुग्णालयांशी जोडतो. प्रिस्क्रिप्शन मॅनेज करणे सोपे जाते. भारतातील आरोग्य यंत्रणेत बदल करण्याची त्यांची इच्छा आहे.