HDFC बँकेनं ग्राहकांना दिला 'तोंड बंद ठेवण्याचा' सल्ला; पाहा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:00 PM2021-06-03T17:00:37+5:302021-06-03T17:09:29+5:30

HDFC Bank : पाहा बँकेनं का दिलाय ग्राहकांना हा सल्ला.

देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक HDFC Bank नं आपल्या ग्राहकांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. परंतु बँकेनं ग्राहकांना चुकीच्या अर्थानं नाही, तर ग्राहकांच्याच सुरक्षेसाठी हा सल्ला दिला आहे.

सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी बँकेनं ग्राहकांना हा मोलाचा सल्ला दिला आहे. सायबर गुन्हेगार कोणत्याही बनावट हेल्पलाईन क्रमांकावरुन कॉल करून तुमच्या पैशांवर डल्ला मारू शकतात. यासाठीच बँकेनं खबरदारी म्हणून तोंड बंद ठेवण्याचा म्हणजेच आपली कोणतीही माहिती न देण्याचा सल्ला दिला आहे.

एचडीएफसी बँकेनं ट्वीट करत ग्राहकांना सतर्क केलं आहे. फसवणुक करणारे लोकं बनावट हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करत आहेत आणि तुमच्या बँकिंग संदर्भातील माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी स्क्रीन शेअरिंग अॅपचा वापर करत आहेत. यासाठीच अशा लोकांनी कॉल केल्यास #MoohBandRakho चा अभ्यास करा, असं बँकेनं म्हटलं आहे.

दरम्यान कोणत्याही अनोखळी क्रमांकावरुन तुमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कॉल आला आणि तुम्हाला अॅप डाऊनलोड करून FD/RD स्टेटसचा अॅक्सेस मागितला तर तो दिला जाऊ नये, असं बँकेनं म्हटलं आहे.

जर तुमच्याकडे अशाप्रकारचा कोणताही कॉल आला तर कोणतीही माहिती देऊ नये. शिवाय एचडीएफसी बँक कोणत्याही ग्राहकाला थर्ड पार्टी अॅपला डाऊनलोड करण्यासाठी सांगत नाही, असंही बँकेनं म्हटलं आहे.

गेल्या वर्षी कोरोना काळात अनेकांची सायबर गुन्हेगारांकडून लूट झाली होती. यावर्षीही हे प्रकार सुरू आहेत. एप्रिल-जून २०२० या कालावधीत १९,९६४ कोटी रूपयांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आले होते.

यामध्ये २,८६७ प्रकरणं समोर आली होती. १२ सरकारी बँकांपैकी एसबीआय बँकेत सर्वाधिक फसवणुकीचे प्रकार समोर आले होते. या प्रकरणातील रक्कम तब्बल २,३२५.८८ कोटी रूपये होते. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँक सातत्यानं माहिती देत असते.

आकडेवारीनुसार एप्रिल-जून २०२० या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांपैकी एसबीआय बँकेत सर्वाधिक २०५० फसवणुकीची प्रकरणं समोर आली होती.

या प्रकरणांमध्ये फसवणूक झालेली एकूण रक्कम २,३२५.८८ कोटी रूपये इतकी होती. मूल्याच्या हिशोबानं बँक ऑफ इंडियाला सर्वात मोठा फटका बसला होता.

या कालावधीत बँक ऑफ इंडियामध्ये फसवणुकीचे ४७ प्रकार समोर आले होते. परंतु यातील रक्कम ही सर्वाधिक म्हणजेच ५,१२४.८७ कोटी रूपये इतकी होती.