Immune India Deposit Scheme: आपल्या पैशांवर अधिक व्याज हवंय?, तर घ्या कोरोनाची लस; 'या' सरकारी बँकेनं आणली नवी स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:06 PM2021-04-13T12:06:27+5:302021-04-13T12:12:24+5:30

Immune India Deposit Scheme: सरकारी बँकेनं सुरू केली स्कीम, लसीकरण केल्यास मिळणार अधिक व्याज

Immune India Deposit Scheme: काय तुम्ही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे? जर नसेल घेतली तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि लस घ्या.

सार्वजनिक क्षेत्रातील एक बँक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणाऱ्या लोकांच्या पैशांवर अधिक व्याज देत आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियानं (Central Bank of India) या योजनेची सुरूवात केली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी बँकेनं ही स्कीम सुरू केली आहे.

सोमवारी सेंट्रल बँकेनं आपल्या या नव्या योजनेची घोषणा केली. बँकेनं या योजनेला इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम (Immune India Deposit Scheme) सुरू केली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही डिपॉझिट स्कीम ११११ दिवसांनी मॅच्युअर होईल. बँकेनं कोरोना काळात लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आणली आहे.

जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यापासून रोखावा असं या स्कीमचं उद्दिष्ट्य आहे.

सेंट्रल बँकेच्या या स्कीम अंतर्गत ज्या ग्राहकांनी लस घेतली आहे त्यांना सध्याच्या दरापेक्षा अधिक व्याजदर देण्यात येणार आहे.

ज्या ग्राहकांनी लस घेतली आहे आणि जे पैस गुंतवतील अशा ग्राहकांना ०.२५ टक्के अधिक व्याज दिलं जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेनं लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचं ग्राहकांना आवाहन केलं आहे.

ज्येष्ठ नागरिकांना या स्कीमअंतर्गत अतिरिक्त ०.२५ टक्क्यांचा फायदा मिळणार असल्याची घोषणाही बँकेनं केली आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

दिल्लीत कोरोनाची चौथी लाट आल्याचं म्हटलं जात आहे. तर मुंबई आणि महाराष्ट्रातही परिस्थिती बिकट झाली असून पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे.

आतापर्यंत देशात १.३५ कोटीपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १.७० लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यूही झाला आहे.

देशात कोरोनाचा अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ लाखांच्यावर गेली असून कोरोनाच्या प्रादुर्भावापासून पहिल्यांदाच ही संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.