Gold Silver Price: लग्नसराईच्या काळात सोनं झालं स्वस्त, करू नका उशीर, पाहा सोन्या-चांदीचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:55 PM2022-11-29T17:55:13+5:302022-11-29T18:01:21+5:30

Gold Silver Price Today 2 : लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर कमी झाल्यानं खरेदीदारांसाठी ही एक आनंदाचीच बातमी ठरली आहे.

लग्नसराईच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 137 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण दिसून आली. एक किलो चांदीचा दर 520 रुपयांनी घसरून 61,590 रुपयांवर आला. सोन्याचा व्यापार एका रेंजमध्ये होत असल्याची प्रतिक्रिया यावर नजर ठेवणाऱ्या तज्ज्ञांकडून देण्यात आली.

सोमवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52852 रुपयांवर बंद झाला होता. परंतु आता तो 52715 रुपयांवर आला. सोन्याच्या दराचा आतापर्यंतचा उच्चांकी दर 56600 रुपये होता.

आपल्या उच्चांकी दरापासून हा दर 3900 रुपये कमी आहे. तर 22 कॅरेट सोन्याचादर 125 रुपयांनी घसरून 48187 रुपये प्रति 10 ग्रामवर आला. IBJA च्या वेबसाईटवर सोन्याचा दर 52715 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. तर दुसरीकडे चांदीचा दर 61590 रुपये किलोवर आला.

देशांतर्गत बाजारपेठेत म्हणजे भारतात लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. चांदणी चौक ज्वेलर्स असोसिएशनचे प्रमुख योगेश सिंघल यांनी सांगितले की, लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. ओरिगो ई-मंडीचे असिस्टंट जनरल मॅनेजर (कमोडिटी रिसर्च) तरुण तत्सांगी यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती ठरविक मर्यादेत राहिल्या आहेत. सोन्यामध्ये एका मर्यादेपर्यंत वाढ झाल्यानंतर त्याची घसरण सुरू होते. आता डिसेंबरपर्यंत एका मर्यादेत व्यापार होताना दिसणार आहे.