लय भारी! रेकॉर्डब्रेक दरापेक्षा ८ हजारांनी स्वस्त झालंय सोनं; आजचा १० ग्रॅमसाठीचा दर काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 11:53 AM2021-05-28T11:53:58+5:302021-05-28T12:02:24+5:30

सोनं खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घेऊयात लेटेस्ट दर...

सोनं खरेदीदारांसाठी खुशखबर आहे. सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोनं आणि चांदीच्या दरात घट नोंदविण्यात आली आहे.

एमसीएक्सवर सोन्याच्या जूनच्या वायदा दरांमध्ये ०.२८ टक्क्यांनी घट दाखवलीआहे. तर जुलैच्या चांदीच्या दरांमध्ये ०.४७ टक्क्यांची घट दाखविण्यात आली आहे.

सोन्याचा नवा दर शुक्रवारी एमसीएक्सवर प्रति १० ग्रॅमसाठी १३६ रुपयांनी खाली उतरला आहे. १० ग्रॅम सोन्यासाठी आजचा दर ४८ हजार ४४५ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे.

देशात सोन्याच्या दरात मार्चमध्ये मोठी घट होऊन प्रति १० ग्रॅमसाठी ४४ हजारांवर आली होती. त्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आणि महागाईत वाढ झाल्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर तब्बल ५६ हजार २०० रुपयांवर अशा रेकॉर्डब्रेक किमतीवर पोहोचला होता. त्यानंतर आता या किंमतीत तब्बल ८ हजारांची घट झाली आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर जुलैच्या वायदा दरात ३३४ रुपयांची घट होऊन प्रति एककिलोसाठी ७१ हजार ३८५ रुपयांवर ट्रेंड करत आहे.

गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यानं दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात ३१९ रुपयांची घट नोंदविण्यात आली होती. तर चांदीच्या दरात १२८७ रुपयांची घट झाली होती.

दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर ४८ हजार २२३ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. तर चांदीचा दर ७० हजार ६३७ रुपये प्रतिकिलो नोंदविण्यात आला आहे.

आगामी काळात मात्र सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सोन्यात गुंतवणूक करण्याचा मार्ग चांगला असल्याचं सांगितलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी सरकारनं १ जूनपासून देशात हॉलमार्किंग (Hallmarking) अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता हॉलमार्किंगसाठी देखील तारीख बदलण्यात आली आहे. आता १५ जूनपासून सोन्यावर हॉलमार्किंग करणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच अर्थ १५ जूनपासून सर्व ज्वेलर्स हॉलमार्किंग असलेलंच सोनं विकू शकतील.