Gold Price Review : सात दिवसांत सोन्याच्या दरात २७६३ रुपयांची वाढ, तर चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 09:29 AM2022-11-16T09:29:36+5:302022-11-16T09:34:56+5:30

गेल्या सात दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात धातूंच्या किंमतीतील तेजीदरम्यान राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याचा भाव 294 रुपयांनी वाढून 53,275 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील ट्रेडिंग सत्रात सोने 52,981 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

तर चांदीचा भावही 366 रुपयांनी वाढून 63,148 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,780 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 22.14 डॉलर प्रति औंस झाला. गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याचे दर 2763 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदीचे दर 5221 रुपयांनी वाढले आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक विजय रजनी यांनी सांगितले की, कोमेक्समधील सोन्याच्या किमती जवळपास तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीच्या जवळ आहेत. सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळाल्याने सराफामधील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे या वर्षी मौल्यवान धातूच्या किमतींवर परिणाम झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

फ्युचर्स ट्रेडमध्ये मंगळवारी सोन्याचा भाव 307 रुपयांनी वाढून 53,025 रुपयांवर पोहोचला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, ऑक्टोबर डिलिव्हरीसाठीचे कॉन्ट्रॅक्ट्स 307 रुपये किंवा 0.58 टक्क्यांनी वाढून 53,025 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते. हे 7,332 लॉटच्या व्यवसायाच्या उलाढालीसाठी आहे.

सणासुदीचा हंगाम सुरू असून, त्यानंतर लग्नसराईचा हंगामही सुरू होणार आहे. लग्नसमारंभात दागिन्यांसाठी सोन्याला मोठी मागणी असते. अशा स्थितीत सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता कमी आहे. जर आपण किमतीत सतत होणाऱ्या वाढीबद्दल बोललो तर त्याचे स्थानिक कारण कमी आणि आंतरराष्ट्रीय कारण जास्त आहे.

केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया सांगतात की, पुढील वर्षी सोन्याचे दर आजवरचा उच्चांकी स्तर गाठू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेनमधील भू-राजकीय तणाव, बाजारातील मंदीची शक्यता, ईटीएफमधील वाढती गुंतवणूक आणि मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची सतत खरेदी हे घटक सोन्याचे भाव आणखी वाढवण्याचे काम करत आहेत.