पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:40 IST2026-01-14T12:36:43+5:302026-01-14T12:40:36+5:30
EPFO EDLI Scheme : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सर्व सभासदांना एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) या योजनेअंतर्गत विम्याचे संरक्षण मिळते. हा विमा पीएफ खात्यासोबतच सुरू होतो.

या विम्यासाठी कर्मचाऱ्याला आपल्या पगारातून एक रुपयाही द्यावा लागत नाही. हा विमा पूर्णपणे मोफत असून त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नसते.

या विमा संरक्षणासाठी लागणाऱ्या हप्त्याचा पूर्ण खर्च तुमची कंपनी किंवा नियोक्ता उचलते. कर्मचाऱ्याच्या पगारातून यासाठी कोणतीही कपात केली जात नाही.

या योजनेअंतर्गत किमान २.५ लाख रुपये आणि जास्तीत जास्त ७ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच मिळते. विम्याची नेमकी रक्कम कर्मचाऱ्याचा मागील १२ महिन्यांचा पगार आणि पीएफ शिल्लक यावर अवलंबून असते.

तुम्ही नोकरीला लागल्यानंतर जेव्हा तुमचे पीएफ खाते उघडले जाते, तेव्हापासूनच तुम्ही या विमा योजनेसाठी पात्र ठरता. यासाठी एलआयसी किंवा इतर विम्याप्रमाणे वेगळी पॉलिसी काढण्याची गरज नसते.

या विम्याचा लाभ कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला मिळतो. मृत्यू झाला त्यावेळी कर्मचारी नोकरीत असणे आवश्यक आहे.

विमाधारकाचा मृत्यू ऑफिसमध्येच व्हायला हवा असे कोणतेही बंधन नाही. कामाच्या ठिकाणी असो वा नसो, कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब या रकमेसाठी दावा करू शकते.

कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी वारसाने आवश्यक कागदपत्रांसह ईपीएफओ कार्यालयात दावा दाखल करावा लागतो.

















