बँकेत जाऊ नका; व्यवहारासाठी NEFT, IMPS, UPIचा वापर करा; RBIच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:46 PM2020-03-17T16:46:09+5:302020-03-17T17:00:09+5:30

चीनच्या वुहान शहरातून जगभरात कोरोना व्हायरस पसरला आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 134 झाली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढतच चालली आहे.

त्यामुळेच आरबीआयनंही बँकांसह ग्राहकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. जनतेनं बँकेचे व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोना व्हायरसला पसरण्यासाठी डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर केला पाहिजे, असंही सुचवलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोमवारी अनेक ऑनलाइन सुविधा 24 तास उपलब्ध करून दिल्या आहेत.

पैशांशी संबंधित असलेल्या व्यवहारासाठी NEFT, IMPS, UPI आणि BBPS फंड ट्रान्सफर सुविधा 24/7 तास पुरवल्या जाणार आहेत.

केंद्रीय बँकेनं कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप लक्षात घेता हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

एनईएफटीमधून (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फण्डस् ट्रॉन्सफर) काही ठराविक काळात ऑनलाइन पद्धतीनं पैसे ट्रान्सफर केले जातात. NEFTद्वारे तुम्ही 2 लाखापर्यंत रोख रक्कम दुसऱ्याच्या अकाऊंटमध्ये पाठवू शकता.

आता या सुविधेची अंमलबजावणी झाल्यामुळे ग्राहकांना दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस केव्हाही एका खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवणं सहजसोपं होणार आहे.

आरबीआय NEFT आणि RTGS द्वारे पैसे पाठवताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. तर IMPS द्वारे आताही बँकेतून पैसे पाठवताना ठराविक रक्कम घेतली जाते. तसेच IMPS द्वारे फक्त काही ठराविक रक्कमच ट्रान्सफर करता येते.

तर RTGS द्वारे आपण मोठी रक्कम ट्रान्सफर करु शकता. मात्र आता NEFT सुविधा ग्राहकांना 24 तास घेता येणार आहे. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करताना ग्राहकांसमोरील अडचणी दूर होणार आहे

आता ग्राहकांना आठवड्यातील सात दिवसांमध्ये कधीही पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करता येणार आहेत. NEFT या सुविधेचा एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेतील खात्यात पैसे पाठवण्यासाठी वापर केला जातो.

टॅग्स :पैसाMONEY